India vs South Africa 1st Test Match: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात सहा गडी गमावून १९४ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान २९ आणि आमिर जमाल 2 धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत पाकिस्तान अजूनही या धावसंख्येपासून १२४ धावांनी मागे आहे. एकेकाळी पाक संघ मजबूत स्थितीत होता. त्यांनी १२४ धावांवर एक विकेट गमावली होती. यानंतर ७० धावा करताना संघाने आणखी पाच विकेट्स गमावल्या.
पाकिस्तानचा पहिला डाव
पाकिस्तानच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. इमाम-उल-हक १० धावा करून बाद झाला. त्याला नॅथन लायनने लाबुशेनच्या हाती झेलबाद केले. यानंतर अब्दुल्ला शफीकने कर्णधार मसूदसह दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. शफीकने कसोटी कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. कमिन्सने ही भागीदारी तोडली, त्याच्याच चेंडूवर त्याने शफीकचा झेल घेतला. तो १०९ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६२ धावा करून बाद झाला. त्यानंतर कमिन्सने बाबर आझमला स्वस्तात क्लीन बोल्ड केले. बाबरला एक धाव करता आली. कर्णधार शान मसूदने आठवे अर्धशतक झळकावले. ७६ चेंडूत ५४ धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. शफीक आणि बाबर दोघेही आऊट झाल्यानंतर आश्चर्यचकित झाले. कमिन्सने शफीक आणि बाबरला बाद केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सौद शकील नऊ धावा करून हेजलवूडचा बळी ठरला. तर, आगा सलमान पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रिझवान आणि जमालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत कर्णधार कमिन्सने सर्वाधिक तीन बळी घेतले आहेत. तर लियॉनला दोन विकेट मिळाल्या. हेजलवूडने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात १८७ धावांवरुन केली आणि उर्वरित सात विकेट्स गमावून त्यात १३१ धावांची भर टाकली. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेडने यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. बुधवारी कांगारूंना पहिला धक्का हेडच्या रूपाने बसला, तो १७ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, लाबुशेनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १७वे अर्धशतक झळकावले. तो १५५ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६३ धावा करून बाद झाला.
मिचेल मार्शने ६० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. अॅलेक्स कॅरी ४ धावा , कर्णधार कमिन्स १३ धावा, स्टार्क नऊ ९ केल्यानंतर आणि लायन आठ धावा करून बाद झाले. तर, हेजलवूड ५ धावा करूनही नाबाद राहिला. पाकिस्तानकडून आमिर जमालने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आगा सलमानला एक विकेट मिळाली.
पहिल्या दिवशी काय झाले?
मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आणि त्या दिवशी केवळ ६६ षटकांचा खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियन संघाने चांगली सुरुवात केली होती. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी आघा सलमानने मोडली. त्याने वॉर्नरला बाबर आझमकरवी झेलबाद केले. वॉर्नरने ८३ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. तर ख्वाजाने १०१ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. ख्वाजाला हसन अलीने झेलबाद केले. स्टीव्ह स्मिथ ७५ चेंडूत २६ धावा करून आमिर जमालच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाकिस्तानकडून हसन आणि सलमानला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.
वॉर्नरच्या नावावर खास विक्रम
३८ धावा करूनही वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. वॉर्नरने स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८,४९६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी वॉर्नर आता स्टीव्ह वॉच्याही पुढे गेला आहे. वॉर्नरच्या नावावर सध्या तिन्ही फॉरमॅटसह १८,५०२ धावा आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये तो आता फक्त रिकी पाँटिंगच्या मागे आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २७,३६८ धावा केल्या होत्या.
दोन्ही संघांचे प्लेइंग–११
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने प्लेइंग-११ मध्ये बरेच बदल केले. सरफराज अहमद, खुर्रम शहजाद, फहीम अश्रफ यांना प्लेइंग-११ मधून वगळण्यात आले. त्यांच्या जागी मोहम्मद रिझवान, हसन अली आणि मीर हमजा यांनी प्लेइंग-११ मध्ये प्रवेश केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केला नाही.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा.