Australia vs Pakistan 3rd Test Pakistan Playing-11: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (३ जानेवारी) सिडनी येथे सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात ३१३ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६/० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ६ धावा करून नाबाद आहे. उस्मान ख्वाजाने अजून खातेही उघडलेले नाही. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ३०७ धावांनी मागे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ८८ धावा केल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या आमिर जमालने ९७ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली. त्याने नऊ चौकार आणि चार षटकार मारले. एकेकाळी पाकिस्तान संघ ९६ धावांत पाच विकेट्स गमावून संघर्ष करत होता. तिथून रिझवान आणि जमाल यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. जमालने मीर हमजाबरोबर १०व्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. यामध्ये हमजाने केवळ ७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना धावा करण्यात अपयश आले

प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानला सुरुवातीच्या षटकांमध्ये कोणताही फायदा झाला नाही. त्याच्या दोन्ही सलामीवीरांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकने मिचेल स्टार्कला स्टीव्ह स्मिथच्या हाती झेलबाद केले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडने सॅम अयुबला बाद केले. अयुबने कसोटी पदार्पण केले, पण पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. अ‍ॅलेक्स कॅरीने त्याचा झेल घेतला.

बाबर आझम पुन्हा ठरला अपयशी

दोन विकेट्स पडल्यानंतर बाबर आझम आणि कर्णधार शान मसूद यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी धावफलक हलता ठेवत ३९ धावांची भागीदारी केली. बाबर २६ धावा करून खेळत असताना पॅट कमिन्सचा इन स्विंग चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार अपील केले, अंपायरने नाबाद दिले नाही. यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने रिव्ह्यू घेतला आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागला, बाबर पॅव्हेलियनमध्ये परतला. तो बाद झाल्यानंतर काही वेळातच सौद शकीलही पॅव्हेलियनमध्ये परतला. शकील (५ धावा) पॅट कमिन्सकरवी यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद झाला. बाबरप्रमाणेच कर्णधार शान मसूदलाही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. ३५ धावा करून तो मिचेल मार्शच्या चेंडूवर बाद झाला, स्टीव्ह स्मिथने त्याचा झेल घेतला.

हेही वाचा: NZ vs SA: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कमकुवत संघ निवडल्याची टीका होताच दक्षिण आफ्रिकेने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही कसोटीचा…”

रिझवानचे शतक हुकले

मोहम्मद रिझवान ८८ धावा करून बाद झाला, त्याचे थोडक्यात शतक हुकले. पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो जोश हेझलवूडकरवी झेलबाद झाला. रिझवानने १० चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्यानंतर साजिद खानही कमिन्सचा बळी ठरला. त्याने १५ धावा केल्या. आघा सलमानने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानचा डाव सावरला. तो ६७ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला ट्रॅविस हेडकरवी झेलबाद केले. हसन अलीलाही (०) त्यानेच बाद केले. लायनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात आमिर जमाल झेलबाद झाला.

दोन्ही संघांचे प्लेइंग११

पाकिस्तान: सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, अली हमजा, आमिर जमाल.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak 3rd test rizwan amir jamals brilliant fifties pakistan bowled out for 313 in first innings avw