Australia vs Pakistan 3rd Test Match: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सिडनीत आमनेसामने येणार आहेत. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर पाकिस्तान संघाने मालिका गमावली आहे. शेवटचा सामना जिंकून मायदेशी परतण्याचे त्याचे लक्ष्य असेल. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा आपला दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला विजयासह अलविदा करण्याचा विचार असेल. वॉर्नरची ही शेवटची कसोटी असेल. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केली होती.
पाकिस्तानला तिसऱ्या कसोटीत २१ वर्षीय अनकॅप्ड सलामीवीर सॅम अयुबला मैदानात उतरवण्याची अपेक्षा आहे. अनुभवी सलामीवीर इमाम-उल-हक दुखापतीमुळे वगळला जाऊ शकतो. अखेर संघ व्यवस्थापनाने अयुबला संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात आहे. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने यावर्षी आठ टी-२० सामने खेळले आहेत. तो कसोटी क्रिकेटमधील तज्ञ मानला जातो. मात्र, त्याने केवळ १४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
हेही वाचा: India Schedule 2024: नवीन वर्षात टीम इंडिया खेळणार टी-२० वर्ल्ड कप, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
अयुबने गेल्या वर्षी प्रथम श्रेणीत पदार्पण केले
चार दिवसांत संपलेल्या पहिल्या दोन कसोटीत पाकिस्तानची फलंदाजी अडचणीत आली होती, त्यामुळे संघ व्यवस्थापन अयुबबरोबर जोखीम पत्करण्यास तयार होते. कराचीच्या या युवा खेळाडूने गेल्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या शॉटस् आणि सकारात्मक वृत्तीने सर्वांना प्रभावित केले आहे. पाकिस्तानही मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदच्या फिटनेसची आतुरतेने वाट पाहत आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या दोन कसोटीत खेळू शकला नाही. सिडनी कसोटीसाठी अबरार वेळेत तंदुरुस्त न झाल्यास पाकिस्तान ऑफस्पिनर साजिद खानला संधी देईल, असे संकेत आहेत. अबरारच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ
दुसरीकडे तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. पर्थमधील पहिली कसोटी आणि मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली म्हणाले, “सिडनी कसोटीसाठीही हाच संघ कायम ठेवण्यात आला आहे. आम्हाला कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवायचे आहे. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा कसोटी सामना आणि त्याच्या घरच्या मैदानावर त्याची अविश्वसनीय कारकीर्द साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
वॉर्नरच्या नावावर खास विक्रम
३८ धावा करूनही वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. वॉर्नरने स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. स्टीव्ह वॉने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८,४९६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी वॉर्नर आता स्टीव्ह वॉच्याही पुढे गेला आहे. वॉर्नरच्या नावावर सध्या तिन्ही फॉरमॅटसह १८,५०२ धावा आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये तो आता फक्त रिकी पाँटिंगच्या मागे आहे. पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २७,३६८ धावा केल्या होत्या.
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.