Shaheen Afridi equaled Shahid Afridi’s record by taking five wickets twice in world cup: सध्या शाहीन आफ्रिदी या युवा गोलंदाजाची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. नव्या चेंडूवर विकेट्स कशी घ्यायची, हे त्याला चांगलेच माहीत आहे. भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत संघाचा विजय किंवा पराभव या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अल्पावधीतच पाकिस्तान संघात आपले स्थान पक्के करणारा हा नवोदित वेगवान गोलंदाज काही वेळातच मॅचविनर गोलंदाज ठरला. उंच डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. यावेळी त्याने एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ वर्षीय शाहीन आफ्रिदीने एकदिवसीय विश्वचषकाच्या १८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५४ धावांत ५ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने एक षटक निर्धाव टाकले. विश्वचषकाच्या इतिहासात शाहीन आफ्रिदीने ५ विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. शाहीनने याआधी २०१९ विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६ बळी घेतले होते. त्याने ५ जुलै २०१९ रोजी लॉर्ड्स येथे बांगलादेशविरुद्ध ९.१ षटकांत ३५ धावांत एकूण ६ विकेट घेतल्या होत्या.

२०११ च्या विश्वचषकात शाहिद आफ्रिदीने दोनदा घेतल्या होत्या ५ विकेट्स –

पाकिस्तानकडून माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि सध्याचे शाहीन आफ्रिदीचे सासरे यांनी २०११ च्या विश्वचषकात दोनदा एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. शाहिद आफ्रिदीने मार्च २०११ मध्ये कॅनडाविरुद्ध १० षटकांत २३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या. याच विश्वचषकात त्याने केनियाविरुद्ध ८ षटके टाकताना, ३ षटके निर्धाव टाकून १६ धावा देत ५ खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. आता जावयाने सासऱ्याच्या १३ वर्षांपूर्वीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. फरक एवढाच की सासऱ्याने विश्वचषकाच्या केवळ एकाच हंगामात हा पराक्रम केला होता, तर जावयाने हा पराक्रम दोन विश्वचषकात केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN: विराटचे शतक हुकवण्यासाठी गोलंदाजाने जाणूनबुजून वाईड टाकला? बांगलादेशच्या कर्णधाराने सांगितले संपूर्ण सत्य

शाहीन आफ्रिदीची आतापर्यंत विश्वचषकातील कामगिरी –

शाहीन आफ्रिदीने विश्वचषकातील ९ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. शाहीन नवीन चेंडू मोठा धमाका करण्यासाठी ओळखला जात असला तरी, त्याने बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जुन्या चेंडूनेही शानदार गोलंदाजी केली. शाहीनने ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटच्या षटकात सलग दोन चेंडूंवर २ विकेट्स घेतल्या. मात्र, या दरम्यान त्याची हॅटट्रिक हुकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak match shaheen afridi equaled shahid afridis record by taking five wickets twice in world cup 2023 vbm