AUS vs PAK, 1st Test Match: पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ३६० धावांनी विजय मिळवला. ४५० धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ दुसऱ्या डावात ८९ धावांत सर्वबाद झाला. या विजयासह कांगारूंनी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तानच्या या दारुण पराभवावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांचं वक्तव्य समोर आलं आहे. त्याने पाकिस्तानी संघावर सडकून टीका करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. त्याचवेळी रमीझ राजानेही आपल्या संघावर संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार?

“ऑस्ट्रेलियात असो किंवा ऑस्ट्रेलियाबाहेर भारतच त्यांना टक्कर देऊ शकतो,” असे वॉनचे मत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीत तो समालोचकांच्या पॅनेलवर होता. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयाला उत्तर देताना वॉनने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाचे कौतुक केले. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप अप्रतिम खेळले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक मुद्द्याचे तज्ञ आहेत. सर्व गोष्टींचा तोंड त्यांनी शोधून त्यावर मात केली. या सामन्यात त्यांनी फलंदाजीपासून ते क्षेत्ररक्षणपर्यंत सर्व गोष्टी कव्हर केल्या आहेत. नॅथन लायनने ५०० कसोटी विकेट्स घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याची या कामगिरीचे वर्णन हे ‘अविश्वसनीय’ असेच करता येईल. या स्तरावर ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी फक्त बीसीसीआय आणि भारताकडे खेळाडू आहेत.” त्याने एकप्रकारे टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

भारताने इतिहास रचला आहे

खरे तर भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांचा २-१ने पराभव केला होता. यानंतर २०२०-२१ मध्येही चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ असा पराभव ऑस्ट्रेलियाला पत्करावा लागला होता. २०१८ मध्ये विराट कोहली कर्णधार होता. त्याच वेळी, २०२०-२१मध्ये रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. अ‍ॅडलेड कसोटीनंतर विराट देशात परतला. मात्र, दोन्ही प्रसंगी प्रशिक्षक रवी शास्त्री होते.

हेही वाचा: WTC Points Table: कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल, पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला झाला फायदा

काय म्हणाले रमीझ राजा आणि वसीम अक्रम?

दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजानेही आपल्या संघावर टीका केली आहे. ट्वीटरवर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रतिकार मेंदू मधून हेतू आणि तंत्रज्ञान दोन्ही गायब होते. दुसऱ्या डावात केवळ ३१ षटकांत बाद होणे निराशाजनक होते. ऑस्ट्रेलियन दुसऱ्या स्तरावर खेळत होते.” त्याचबरोबर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही आपल्या संघाला सल्ला दिला आहे. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असते.”

अक्रम पुढे म्हणाला, “कुकाबुरा चेंडू १५ षटकांनंतर कोणतीही स्विंग किंवा सीम हालचाल करत नाही. तुम्ही शॉर्ट बॉलिंग करायला हवी होती. त्यांना चेंडूच्या गतीची जाणीव होते. त्यामुळे ते चांगले खेळू शकतात आणि हुक शॉट मारू शकतात. माझा सर्व पाकिस्तानी गोलंदाजांना सल्ला आहे की, तुमच्या गोलंदाजीची लेंथ खूप महत्त्वाची आहे. ज्या क्षणी तुम्हाला लेंथ बरोबर मिळेल, तुम्ही फलंदाजांना त्रास देऊ शकता, परंतु शॉर्ट बॉलमुळे ते शक्य होत नाही. येथे परिस्थितीत बघून क्रिकेट खेळावे लागेल. ग्राउंडवर बाऊन्स आहे म्हणून जास्त उत्साही होऊ नका.” बाबर बाद झाल्यानंतर अक्रमची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे. तो चिडून टाळ्या वाजवतो.

हेही वाचा: IND vs SA 1st ODI: साई सुदर्शनने मोडला के.एल. राहुल, रॉबिन उथप्पाचा विक्रम; जाणून घ्या क्रिकेट करिअरची पार्श्वभूमी

काय घडलं सामान्यमध्ये?

जर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला आहे. रविवारी कसोटीचा चौथा दिवस होता आणि कांगारूंनी चौथ्या दिवशीच पाकिस्तानचा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला ४५० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, यानंतर पाकिस्तानचा संघ प्रत्युत्तरात ८९ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ४५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २७१ धावांवर आटोपला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाला २१६ धावांची आघाडी मिळाली.

ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ५ बाद २३३ धावांवर घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे २१६ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ४४९ धावांची झाली. कांगारूंनी पाकिस्तानला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात स्टार्क आणि हेझलवूडने भेदक गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले, तर नॅथन लियॉनने दोन गडी बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak only india can win in australia vaughan took a dig at pakistans defeat ramiz raja said this avw