Australia vs Pakistan 3rd Test Pakistan Playing-11: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग-११ जाहीर केली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि सलामीवीर फलंदाज इमाम-उल-हक ३ जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या सामन्यात खेळणार नाहीत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ मालिकेत ०-२ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत अभेद्य अशी आघाडी मिळवली आहे. तिसरा सामना जिंकून शान मसूदच्या संघाला सन्मानाने मायदेशी परतायचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमाम-उल-हकला वगळण्यात आले असून शाहीनला विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांच्या जागी फिरकीपटू साजिद खान आणि युवा सलामीवीर सॅम अयुब यांना संघात ठेवण्यात आले आहे. अयुबचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. इमामने दोन सामन्यांत २३.५०च्या सरासरीने ९४ धावा केल्या आहेत. या काळात त्याने अर्धशतक झळकावले. खराब फॉर्ममुळे इमामला संघातून वगळावे लागले. शाहीन आफ्रिदीबद्दल जर बोलायचे झाले तर त्याने दोन कसोटीत आठ विकेट्स घेतल्या.

कोण आहे सॅम अयुब, त्याला पाकिस्तानची नवी आशा का म्हणतात?

युवा डावखुरा फलंदाज सॅम अयुबने यावर्षी आठ टी-२० सामने खेळले आहेत. तो प्रथम श्रेणी कसोटी क्रिकेटमधील विशेष फलंदाज मानला जातो. मात्र, त्याने यावेळच्या हंगामात केवळ १४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. कराचीच्या या युवा खेळाडूने गेल्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने आणि सकारात्मक वृत्तीने सर्वांना प्रभावित केले आहे, म्हणूनच त्याला पाकिस्तानची नवी आशा म्हणतात.

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये के.एल. राहुल आणि विराट कोहली करणार ‘हा’ खास विक्रम; जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल नाही

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्यासाठी प्लेइंग-११मध्ये एकही बदल केलेला नाही. संघाने दुसरा फिरकीपटू न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सामना आहे. कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने त्यांच्या ७९ धावांनी विजयात मोलाची भूमिका बजावली.” तो पुढे म्हणाला की, “सिडनीमध्ये फिरकीपटूंना मदत मिळते, पण आम्ही दुसरा फिरकीपटू खेळवणार नाही. आम्हाला आमच्या वेगवान गोलंदाजीवर पूर्ण भरवसा आहे. वॉर्नरचीही ही ११२वी आणि शेवटची कसोटी असेल. आम्ही त्याला ही कसोटी जिंकून एक मोठी भेट देणार आहोत.”

दोन्ही संघांचे प्लेइंग११

पाकिस्तान: सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, अली हमजा, आमिर जमाल.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak playing 11 pakistan dropped imam and shaheen afridi from playing 11 gave a chance to this player avw