Australia vs Pakistan 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७१ धावांवरच मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१६ धावांची आघाडी मिळाली. सामन्याच्या तिसर्‍या दिवशीचा (१६ डिसेंबर) खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ८४ धावा आहे. त्याची एकूण आघाडी ३०० धावांची झाली आहे. जेव्हा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ नाबाद ४३ आणि उस्मान ख्वाजा नाबाद ३४ धावांवर खेळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. खुर्रम शहजादने त्याला इमाम उल हककरवी झेलबाद केले. मार्नस लाबुशेन केवळ दोन धावा करता आल्या. खुर्रमने त्याची विकेट घेतली.

इमामने अर्धशतक झळकावले, लियॉनने तीन विकेट्स घेतल्या

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१६ डिसेंबर) पाकिस्तान संघ दुसऱ्या दिवसाच्या १३२/२च्या स्कोअरच्या पुढे खेळायला आला. ती केवळ २७१ धावांपर्यंतच मर्यादित राहिली. त्यात केवळ इमाम-उल-हकला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला. इमामने सर्वाधिक ६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहितला हटवल्यानंतर आकाश चोप्राचे सूचक विधान; म्हणाला, “… एका युगाचा अंत”

बाबर आझमची बॅट चालली नाही

शनिवारी दिवसाची सुरुवात पाकिस्तानसाठी चांगली झाली नाही. पाकिस्तानला तिसरा धक्का खुर्रम शहजादच्या रूपाने बसला. शहजादला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. तो सात धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या माजी कर्णधार बाबर आझमने चांगली सुरुवात केली, मात्र त्याला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. बाबर २१ धावा करून बाद झाला. मिचेल मार्शच्या चेंडूवर यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने त्याचा झेल घेतला. इमाम-उल-हक १९९ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीकरवी यष्टिचित केले.

सरफराज आणि शकीलही अपयशी ठरले

सरफराज अहमद अपयशी ठरला. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. सरफराजला मिचेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. सौद शकीलही काही विशेष करू शकला नाही. तो ४३ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडच्या चेंडूवर तो डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद झाला. त्याच्यानंतर आलेला फहीम अश्रफही (नऊ धावा) फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. पॅट कमिन्सच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाने त्याला झेलबाद केले. १० धावा केल्यानंतर आमिर जमाल नॅथन लायनच्या चेंडूवर अ‍ॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद झाला. शाहीन आफ्रिदीला चार धावांवर ट्रॅविस हेडने ख्वाजाकरवी झेलबाद केले.

हेही वाचा: IND W vs ENG W: कसोटी विजयानंतर हरमनप्रीतने प्रशिक्षक मुझुमदार यांचे केले कौतुक; म्हणाली, “कर्णधारपदाच्या अनुभवाचा…”

शुक्रवारी या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कांगारूंचा पहिला डाव ४८७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक १६४ धावा केल्या त्याला मिचेल मार्शने ९० धावा करत साथ दिली. या कसोटीत पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आमिर जमालने सहा विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने पहिल्या डावात २ गडी गमावून १३२ धावा केल्या होत्या. खुर्रम शहजाद सात धावांवर नाबाद राहिला तर इमाम उल हक ३८ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा ३५५ धावांनी मागे होता.

इमाम आणि शफीक यांनी दमदार सुरुवात केली होती

इमामने अब्दुल्ला शफीकबरोबर पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची शानदार भागीदारी केली. शफीक १२१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याला नॅथन लायनने झेलबाद केले. त्याचवेळी कर्णधार शान मसूदच्या रूपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. ४३ चेंडूत ३० धावा करून तो बाद झाला. मसूदला स्टार्कने यष्टिरक्षक कॅरीच्या हाती झेलबाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak third days play ends australias score 842 took a lead of 300 runs against pakistan avw