कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत ६ गडी राखून जिंकला. कांगारू संघाने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकला. या सामन्याचा निकाल दोन दिवसात लागल्याने आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशात खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर यांनी ट्विट करुन चिमटा काढला आहे. ज्यामध्ये त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्यांच्या खेळपट्टीवर सडकून टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ९९ धावांत सर्वबाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे भारताला कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत फायदा झाला. भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. यामुळे सामना दोन दिवसांत संपला. संघाने पहिल्या डावात सर्वबाद १५२ धावा केल्या होत्या. यादरम्यान काईल व्हेरेनने ६४ धावांची खेळी केली.
यादरम्यान लायन आणि स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक गोलंदाजी केली. स्टार्कने १४ षटकात ४१ धावा देत ३ बळी घेतले. लायनने ८ षटकांत १४ धावांत ३ बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अशात आता वीरेंद्र सेहवागने दोन दिवसात संपलेल्या सामन्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीचा समाचार घेताना सडकून टीका केली आहे.
माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहले,” १४२ षटके आणि २ दिवसही चालले नाही, कोणत्या प्रकारच्या खेळपट्ट्या हव्यात यावर व्याख्यान देण्याचे धाडस त्याच्याकडे आहे. हे भारतात घडले असते, तर त्याला कसोटी क्रिकेटचा अंत, कसोटी क्रिकेटचा नाश आणि काय नाही म्हटले असते. ढोंगीपणा मनाला चटका लावणारा आहे.”
त्यायबरोबर वसीम जाफरने देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चिमटा काढण्यासाठी एक खोचक ट्विट केले आहे. ज्यामध्ये एक मजेशीर मीम्स शेअर करताना म्हणले, ”जर एका उपखंडात कसोटी २ दिवसांत संपली असती, तर प्रतिक्रिया अगदी वेगळ्या असत्या.”
दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि सर्वबाद होईपर्यंत २१८ धावा केल्या. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने ९२ धावांची शानदार खेळी केली. त्याने 96 चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. अॅलेक्स कॅरी २२ धावा करून नाबाद राहिला. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने ४ बळी घेतले. जेन्सनने ९ षटकांत ३२ धावा देत ३ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या ९९ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान संघाचे ४ खेळाडू खाते न उघडताच बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक गोलंदाजी करताना कमिन्सने ५ बळी घेतले. त्याने १२.४ षटकात ४२ धावा देत ३ निर्धाव षटके टाकली. तर स्टार्क आणि बोलंडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ गडी गमावून ३५ धावा केल्या आणि सामना जिंकला.