ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावली. मात्र, नंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशन यांनी डाव सांभाळला. सध्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगदरम्यान अशी घटना घडली की पाहून सगळेच थक्क झाले.
डेव्हिड वॉर्नरची विकेट पडल्यानंतर मार्नस लाबुशन मैदानात उतरला आणि डाव सांभाळला. तो ७३ धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीदरम्यान अशी घटना घडली की सगळेच क्षणभर अवाक् झाले. खरं तर, लाबुशनने अचानक षटकाच्या मध्यभागी डगआउटकडे मजेशीर हातवारे करण्यास सुरुवात केली, प्रथम तो हेल्मेटवर हात फिरवत होता, त्यानंतर त्याने सिगारेट ओढण्याचा इशारा केला आणि लायटर मागवला.
लाबुशन च्या मागणीनुसार, दोन खेळाडूंनी डगआउटमधून लायटर आणला, जो लाबुशनने आपल्या हातात पकडला आणि बॅट दुरुस्त करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. कारण कसोटी क्रिकेटच्या मैदानावर लायटर अचानक आणणे खूप मजेशीर होते.
माईक हसीने सांगितले की त्याच्या हेल्मेटवर काही तुकडे होते, जे त्याच्या डोळ्यांवर येत होते. लक्षणीय बाब म्हणजे, लाबुशन मैदानातील त्याच्या मजेशीर कृत्यांसाठी नेहमीत ओळखला जातो. तो अनेकदा सिली पॉइंट सारख्या ठिकाणी फलंदाजांशी संवाद साधताना दिसतो.
सामन्याबद्दल बोलायचे तर, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर विकेट लवकर गमावली. पण ख्वाजा आणि लाबुशन या जोडीने घरच्या संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिले. कांगारूंनी तीन सामन्यांची मालिका आधीच २-० अशी जिंकली असून त्यांचा व्हाईटवॉशचा प्रयत्न असेल. येथील विजयामुळे त्यांचे कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. बहुधा त्यांचा सामना या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीत भारताशी होईल.