ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने महान डॉन ब्रॅडमनची बरोबरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात स्मिथने कसोटी कारकिर्दीतील २९वे शतक झळकावले. यासह त्याने ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. स्मिथचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४१ वे शतक होते. आता त्याने या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
रोहितने भारतासाठी आतापर्यंत ४१ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी स्मिथने त्याची बरोबरी केली असून या मालिकेत तो रोहित शर्माला मागे टाकण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्मिथ रोहितसोबत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत भारताचा विराट कोहली ७१ शतकांसह पहिल्या, जो रूट आणि डेव्हिड वॉर्नर ४४ शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या आणि रोहित-स्मिथ संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.
स्मिथपेक्षा फक्त तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटीत जास्त शतके झळकावली आहेत. यामध्ये रिकी पाँटिंग ४१ शतकांसह पहिल्या, स्टीव्ह वॉ ३२ शतकांसह दुसऱ्या आणि मॅथ्यू हेडन ३० शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
स्मिथने आपल्या २९व्या कसोटी शतकासाठी १८० चेंडूंचा सामना केला. या सामन्यात त्याने मार्नस लबुशेनसोबत २५१ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. सर्वात कमी डावात २९ कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या आधी भारताच्या सचिन तेंडुलकरचे नाव आहे, ज्याने १४८ डावांमध्ये १९ वे कसोटी शतक झळकावले. त्याच वेळी, डॉन ब्रॅडमन या बाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. त्याने २९ शतकांसाठी केवळ ७९ डाव घेतले.
हेही वाचा – SAT20 League: एमएस धोनी सोबत मुंबईत पोहोचला ग्रॅम स्मिथ; ‘हा’ संघ होणार भारतात लॉन्च
स्टीव्ह स्मिथने आपली खेळी पुढे सुरु ठेवताना ३११ चेंडूत नाबाद २०० धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार लगावले. त्याचबरोबर मार्नस लॅबुशेनने देखील २०४ धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाचा डाव ४ बाद ५९८ धावांवर घोषित केला.