ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. विडिंजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी राष्ट्रगाण सुरू असताना दोन्ही संघ मैदानात एका ओळीत उभे असताना एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन राष्ट्रगीतावेळी इतर खेळाडूंच्या शेजारी न उभा राहता, थोड्या अंतरावर उभा होता. तसेच राष्ट्रगीतावेळी त्याच्या समोर लहान मुलगाही उपस्थित नव्हता. एवढेच नाही तर मैदानावरही इतर खेळाडू त्याच्यापासून लांब उभे होते. विकेट पडल्यानंतर आनंद व्यक्त करत असताना ग्रीन लांबूनच आपला आनंद व्यक्त करत होता. या सर्व प्रकाराचे कारण म्हणजे कॅमरून करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्याच्यापासून सर्व खेळाडूंनी “दो गज की दुरी” राखली आहे.
करोना पॉझिटिव्ह असूनही मैदानात कसा?
करोना पॉझिटिव्ह असूनही कॅमेरून ग्रीनला अंतिम अकरामध्ये स्थान दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. दुसरीकडे ग्रीन मात्र ड्रेसिंग रुमपासून ते मैदानावर क्षेत्ररक्षण करताना घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. नाणेफेक झाल्यानंतर नियमाप्रमाणे राष्ट्रगीत सुरू असताना ग्रीन आपल्या सहकाऱ्यांपासून थोड्या अंतरावर दूर उभा होता. यानंतर मैदानातही इतर खेळाडूंसह विकेट पडल्याचे सेलिब्रेशन करताना तो जवळ येत नव्हता.
दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बुधवारी कॅमेरून ग्रीन करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तरीही कर्णधार पॅट कमिंसने ग्रीनला अंतिम अकरामध्ये स्थान दिले. ग्रीनच्या आधी अँड्रू मॅकडोनल्डही करोना पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र त्यालाही अंतिम अकरामध्ये कायम ठेवले आहे.
विशेष म्हणजे करोना पॉझिटिव्ह खेळाडूला मैदानात उतरविण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताच्या विरोधात अंतिम सामन्यात ‘ताहिला मॅकग्रा’ला मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात सात धावांनी ऑस्ट्रेलियाने विजयदेखील मिळविला होता.
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरोधात पहिल्या कसोटीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार पॅठ कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गतवर्षी आयसीसी कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले होते. यावर्षीही कसोटी गुणतालिकेत ते प्रथम स्थानावर आहेत.
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघाचा अंतिम अकरा संघ :
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड
वेस्ट इंडिज – क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, एलिक अथांजे, क्वाम हॉज, जस्टिन ग्रीव्हज, जोशुआ दा सिल्वा, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.