India vs Australia T20 Women’s World Cup Match Highlights in Marathi: भारत वि ऑस्ट्रेलियामध्ये उपांत्य फेरीच्या दृष्टीने टी-२० विश्वचषक २०२४ मधील महत्त्वाचा सामना खेळवला जात होता. शेवटपर्यंत भारताकडून हरमनप्रीतने चांगली झुंज दिली. पण अखेरीस भारताला ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारता विरूद्धचा सामना सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाचा संघ अ गटातून उपांत्य फेरीत पोहोचला होता. गट सामन्यात ऑस्ट्रेलिया अपराजित राहत सर्व चार सामने संघाने जिंकत ८ गुण मिळवले आहेत. भारत पराभूत झाल्याने त्यांचे ४ गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून शफाली वर्माने चांगली फटकेबाजी केली, पण भारताने झटपट विकेट गमावले. पॉवरप्लेमध्ये भारताने ४१ धावा केल्या, तर ६ ते १० षटकांमध्ये भारताने फक्त २६ धावा केल्या. आऊटफिल्ड स्लो असल्याचाही भारताला चांगलाच फटका बसला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ४७ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या. यासह भारतासाठी टी-२० विश्वचषकात मिताली राजबरोबर सर्वाधिक धावा करणारी संयुक्त फलंदाज बनली आहे. दोघींनी आतापर्यंत ७२६ धावा केल्या आहेत.
१५२ धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा २० धावा करून बाद झाली. ती बाद झाल्यानंतर स्मृतीही ६ धावांवर बाद झाली. जेमिमा चांगली फटकेबाजी करत होती, पण तीही मोठा फटका खेळताना १६ धावा करून बाद झाली. ती बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती यांनी संघाची धुरा सांभाळली. दीप्तीही २९ धावा करून बाद झाली. दीप्ती बाद झाल्यानंतर हरमनप्रीतला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही आणि टीम इंडियाला निर्धारित २० षटकांत केवळ १४२ धावा करता आल्या.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हरमनप्रीतने १ धाव घेत पूजाला स्ट्राईक दिली. भारताला आता ५ चेंडूत १३ धावांची गरज होती. सदरलँड गोलंदाजी करत होती आणि तिने दुसऱ्या चेंडूवर पूजाला क्लीन बोल्ड केलं. यानंतर तिसऱ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या राधा यादवला धावबाद करत भारताला अजून एक धक्का दिला. यानंतर चौथ्या चेंडूवर हरमनप्रीतने पुन्हा एक धाव घेत श्रेयंका पाटीलला स्ट्राईक दिली. श्रेयंका २ चेंडूत १२ धावा हव्या असताना पाचवा वाई़ड दिला गेला पण श्रेयंकाही धाव बाद झाली. तर पाचव्या चेंडूवर राधा यादव पायचीत होत माघारी परतली आणि सहाव्या चेंडूवर रेणुकाने एक धाव घेतली पण तोवर सामना भारताच्या हातून निसटला होता.
तत्पूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट्सवर १५१ धावांवर रोखले होते. भारताकडून रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत ४० धावा केल्या. यााशिवाय कर्णधार मॅकग्राने ३२ आणि एलिस पेरीने ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
हेही वाचा – IND W vs AUS W: राधा यादवचा कमाल डायव्हिंग कॅच, रेणुका सिंगच्या सलग २ चेंडूत २ विकेट, पाहा VIDEO
उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारतासाठी कसं आहे समीकरण
आता भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी न्यूझीलंड वि पाकिस्तान सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठायची जायचे असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. याशिवाय भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला असायला हवा. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा नेट रन रेटही घसरला आहे. भारताचा नेट रन रेट आता धन ०.३२२ असा आहे. तर न्यूझीलंड संघाचा नेट रन रेट धन ०.२८२ आहे. जर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा पराभव केला तर न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल होईल.