AUS W vs PAK W Australia Women beat Pakistan Women by 9 Wickets : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील १४ वा सामना ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियन महिला संघाने हा सामना ९ विकेट्सनी एकतर्फी जिंकला. या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या विजयाने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीचा आणखी खडतर झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ८९ धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ११ व्या षटकात सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

आता टीम इंडिया उपांत्य फेरीत कशी पोहोचणार?

टीम इंडिया सध्या अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप स्टेज संपल्यानंतर अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. अशा स्थितीत भारताला आपले स्थान कायम राखावे लागेल. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियाला आपला शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. याशिवाय नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल. तरच भारतीय संघ सहज उपांत्य फेरी गाठू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला तर काय होईल?

जरी भारताने आपला शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला, तरी भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. या सामन्याचा निकालही भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. जर किवी संघाने हा सामना जिंकला आणि त्यानंतर श्रीलंकेलाही पराभूत केले, तर भारताच्या अडचणींमध्ये लक्षणीय वाढ होईल. कारण भारताला त्यानंतर उपांत्य फेरी गाठता येणार नाही. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडने दोनपैकी एक सामना पराभूत होणे अपेक्षित आहे. याशिवाय त्यांचा नेट रन रेटही भारतापेक्षा खराब असावा लागेल.

हेही वाचा – PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’

श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर –

श्रीलंकेचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. लंकेने तिन्ही सामने गमावल्यामुळे ते गट-अ मध्ये तळाच्या स्थानावर आहे. मात्र, श्रीलंकेला भारताला मदत करण्याची संधी आहे. लंकेने आपल्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर भारताच्या पुढील फेरीत जाण्याच्या आशांना थोडे बळ मिळेल. मात्र, असे असतानाही न्यूझीलंडला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.