गेल्या महिन्यात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनी सायबरसिटी असलेलं हैदराबाद हादरलं, पण त्यानंतर तब्बल ११ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाच्या सहजासहजी हार न मानणाऱ्या संघाला भारताने आपल्या फिरकी बॉम्बने हादरा दिला. या बॉम्बची तीव्रता एवढी जबरदस्त होती की मंगळवारी ऑस्ट्रेलियाचे आठ फलंदाज अवघ्या दोन तासांतच धारातीर्थ पडले. चेपॉकवरच्या पहिल्या विजयापेक्षा राजीव गांधी स्टेडियमवर मिळवलेला हा विजय भारताचे मनोबल उंचावणारा आणि ऑस्ट्रेलियाला निराशेच्या गर्तेत लोटणारा नक्कीच होता. कारण या पराभवाने ऑस्ट्रेलियाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि भारतीय गोलंदाजांचा खासकरून फिरकीपटूंचा प्रतिकार करणे त्यांच्या हाताबाहेर असल्याचेच जाणवले. कोणत्याही क्षणी सामन्यात परतण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाच्या खडूस, खुनशी संघात असल्याचे बोलले जात असले तरी हा सामना त्याला नक्कीच अपवाद ठरला. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंनी आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची वरात काढली आणि विजयाचे कुंकू सन्मानाने संघाच्या कपाळी लावले. दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाला १३१ धावांमध्येच गुंडाळत १ डाव आणि १३५ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. द्विशतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अश्विनने पाच, तर जडेजाने तीन बळी मिळवीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका वठवली.
भारताचे गेल्या सामन्यात डावाने विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले होते, त्यामुळे या सामन्यात डावाने विजय मिळवण्याचे ध्येय घेऊन ते चौथ्या दिवशी मैदानात उतरले. शेन वॉटसन, कर्णधार मायकेल क्लार्क आणि मोझेस हेन्रिक्स हे त्रिकूट या वेळी भारताच्या डावाच्या विजयात आडवे येण्याची शक्यता होती. पण या तिघांसह ऑस्ट्रेलियाच्या संघालाच भारताने सहज आडवे करीत ‘चीतपट’ही केले. वॉटसनला (९) ईशांतने स्वस्तात गुंडाळले. क्लार्क (१०) खेळपट्टीवर पाय रोवण्यासाठी आला होता खरा, पण जडेजाच्या अप्रतिम चेंडूने त्याच्या यष्टय़ांचा वेध घेतला आणि ऑस्ट्रेलियाची मधली फळी मोडली. पहिल्या कसोटीत भारताच्या गोलंदाजांचे घामटे काढणाऱ्या हेन्रिक्सला (०) जडेजानेच अप्रतिमरीत्या थेट फेकीने धावबाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ जास्त तग धरू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. याच दरम्यान खेळपट्टीवर नांगर टाकण्यासाठी आलेल्या ई. डी. कोवनला (४४) जडेजानेच बाद करीत भारताला विजयाची वाट दाखवली. दिवसाच्या सुरुवातीला जास्त चमक दाखवू न शकणाऱ्या अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला जास्त वळवळ करू दिले नाही आणि भारताने सहजपणे दुसऱ्या सामन्यावरही वर्चस्वाचा झेंडा फडकवला.
ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा चौथ्या दिवशी फलंदाजीला आला तेव्हा ते १९२ धावांनी पिछाडीवर होते, पण अवघ्या ३५ षटकांत त्यांनी ५७ धावांमध्ये ८ फलंदाज गमावले आणि पराभव पदरी पाडून घेतला.

पाचव्या दिवसाचे पैसे परत मिळणार
हैदराबाद : भारतीय संघाने दिमाखदार प्रदर्शन करीत चौथ्या दिवशी उपाहाराआधीच विजय मिळवला. मात्र सामना एवढय़ा झटपट संपल्याने पाचव्या दिवसाचे तिकीट असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. त्यांची निराशा काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने केला आहे. पाचव्या दिवसाचे तिकीट असलेल्या क्रिकेटरसिकांना असोसिएशन पैसे परत देणार आहे.

पुजारा, अश्विन कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी
दुबई : आपल्या शानदार प्रदर्शनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि रवीचंद्रन अश्विन यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत कारकिर्दीत सर्वोत्तम स्थानी झेप घेतली आहे. हैदराबाद कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या पुजाराने १२ स्थानांनी आगेकूच करीत ११ व्या स्थानी झेप घेतली आहे. याच कसोटीत सहा विकेट्स पटकावणाऱ्या अश्विनने क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा करीत आठवे स्थान पटकावले आहे.  दरम्यान, क्रमवारीत सचिन तेंडुलकरची १७ वरून १९ व्या स्थानी घसरण झाली आहे. शानदार शतकासह पुनरागमन करणारा मुरली विजय ६० व्या स्थानी पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये हरभजन २५, रवींद्र जडेजा ४०, तर भुवनेश्वर कुमार ९७ व्या स्थानी आहे.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९ बाद २३७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) :  सर्व बाद ५०३.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ई. डी. कोवन झे. सेहवाग गो. जडेजा ४४, डेव्हिन वॉर्नर त्रि. गो. अश्विन २६, फिलीप ह्य़ुजेस त्रि. गो. अश्विन ०, शेन वॉटसन झे. धोनी गो. शर्मा ९, मायकेल क्लार्क त्रि.गो जडेजा १६, मॅथ्यू वेड झे. सेहवाग गो. अश्विन १०, मोझेस हेन्रिक्स धावचीत (जडेजा) ०, ग्लेन मॅक्सवेल पायचीत गो. अश्विन ८, पीटर सिडल झे. कोहली गो. जडेजा ४, जेम्स पॅटिन्सन पायचीत गो. अश्विन ०, झेव्हियर डोहर्टी नाबाद १, अवांतर (बाइज ७, लेग बाइज ६) १३, एकूण ६७ षटकांत सर्व बाद १३१.
बाद क्रम : १- ५६, २- ५६, ३-७५, ४-१०८, ५-१११, ६-१११, ७-१२३, ८-१३०, ९-१३०, १०-१३१.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-४-७-०, आर. अश्विन २८-१२-६३-५, हरभजन सिंग १०-७-१०-०, रवींद्र जडेजा १८-८-३३-३, ईशांत शर्मा ५-२-५-१.
सामनावीर : चेतेश्वर पुजारा, निकाल : भारत विजयी.

Story img Loader