AUS vs ENG Highlights in Marathi: ऑस्ट्रेलियाच्या संघाने वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. पण हार मानेल तो ऑस्ट्रेलियाचा संघ कसला… बडे खेळाडू संघाचा भाग नसतानाही ऑस्ट्रेलियाच्या नवख्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २००९ नंतर म्हणजेच १६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३५१ धावांचा डोंगर उभारला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आजवर कोणत्याच संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. पण इंग्लंडने बेन डकेटच्या १६५ धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर ही कामगिरी आपल्या नावे केली. पण ऑस्ट्रेलियाने मात्र ५ विकेट्सने विजय मिळवत आपल्या नावे नवा रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाचे संघातील वरिष्ठ खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड स्वस्तात बाद झाले. पण नवा सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने ६३ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर मार्नस लबुशेनने ४७ धावांची खेळी केली. तर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिसने वनडेमधील आपले पहिले शतक झळकावत मोठा विक्रमही आपल्या नावे केला. इंग्लिसने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील संयुक्त जलद शतक झळकावले आहे. त्याने वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली. जोश इंग्लिसने ८६ चेंडूत ६ षटकार आणि ८ चौकारांसह १२० धावांची नाबाद खेळी केली. यानंतर अॅलेक्स कॅरीसह त्याने केलेली भागीदारी मॅचविनिंग ठरली.

अॅलेक्स कॅरीने ६३ तेंडूत ८ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली तर मॅक्सवेलनेही येताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलने १५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह इंग्लिसला चांगली साथ दिली. इंग्लंडच्या गोलंदाजांची या नव्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धुलाई केली. जोफ्रा आर्चरविरूद्ध १० षटकांत ८२ धावा केल्या ज्यात त्याने १ विकेट घेतली. याशिवाय जो रूट वगळता सर्व गोलंदाजांनी एकेक विकेट घेतली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्याने इंग्लंडला गोलंदाजीसाठी पाचारण केले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३५१ धावा केल्या होत्या.फिल सॉल्ट १० धावा करून बाद झाला. यानंतर बेन डकेटने १६५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. यानंतर जो रूटने ६८ धावा केल्या. जोस बटलर २३ धावा, लिव्हिंगस्टोन १४ धावा तर जोफ्रा आर्चरने २१ धावा करत संघाला विक्रमी धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुईसने ३ विकेट्स मॅक्सवेलने एक तर झाम्पा आणि लबुशेनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

Story img Loader