अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ८ गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-२० वर्ल्डकपवर चौथ्यांदा नाव कोरलं आहे. गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा ८ गड्याने पराभव केला. गार्डनसने प्रथम गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना ३३ धावांचे योगदान दिले.

यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १०५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने १५.१ षटकांत १०६ धावा करत अजिंक्यपद आपल्या नावे केले.

इंग्लंड महिला संघाकडून डॅनिअल वेट आणि इंग्लिश कर्णधार हेदर नाईट यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला अपेक्षेनुसार कामगिरी करताना आली नाही. डॅनिअल वेटने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार नाईटने २५ धावांचे महत्वपुर्ण योगदान दिले. वेट आणि नाईट यांच्याशिवाय एकाही इंग्लिंश खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाजांनी टिच्चून मारा करत फलंदाजांना जखडून ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनसने सर्वाधिक तीन फलंदाजांना बाद केले.

ऑस्ट्रेलियाकडून गार्डनसने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. याशिवाय अलिसा हेली (२२ धावा) आणि मेग लेनिंग (२८ धावा) यांनीही विजयात महत्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने १५.१ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावा केल्या.

गार्डनसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर अलिसा हेलीला मालिकावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिला टी२० वर्ल्डकपमध्ये अलिसा हेलीने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची भूमिका पार केली आहे.