न्यूझीलंडला पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ५२ धावांनी पराभूत करत ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी ३२७ धावांवर संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला. या सामन्यात २३९ धावांची दमदार खेळी साकारणारा ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम व्होग्स हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
रविवारच्या ४ बाद १७८ या धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मार्क क्रेग (नाबाद ३३) आणि टीम साऊथी (४८) या तळाच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण संघाला डावाचा पराभवाची नामुष्की टाळता आली नाही.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अपेक्षित धावांपर्यंत पोहोचू दिले नाही. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑनने सर्वाधिक चार फलंदाजांना बाद केले, तर मिचेल मार्शने तीन बळी मिळवले.

Story img Loader