ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना २०८ धावांनी जिंकला आणि या दोन संघांमधील तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकलम याला बाद करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरल्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली.
विजयासाठी ५०४ धावांचे आव्हानास सामोरे जाताना न्यूझीलंडने ३ बाद १४२ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मॅकलम हा ८० धावांवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयातील अडथळा दूर झाला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दुसरा डाव २९५ धावांवर संपुष्टात आणला. मॅकलम याने कोणतेही दडपण न घेता खेळ केला. तो शतक टोलविणार असे वाटत असतानाच त्याला स्लीपमध्ये झेलबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. पंच निगेल लिलाँग यांनी दिलेल्या या निर्णयावर मॅकलम याने तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या बॅटीस हा चेंडू लागला नव्हता असे त्याने पंचांना सांगितले मात्र पंचांनी आपला निर्णय बदलला नाही.मॅकलम याने शैलीदार खेळ करीत ८० धावा केल्या. शेवटच्या फळीत क्रेग व ट्रेन्ट बोल्ट यांनी संघाचा पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटच्या विकेटसाठी ४६ धावांची भर घातली. बोल्ट हा १५ धावांवर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. क्रेग याने नाबाद २६ धावा केल्या.
या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक टोलविणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याला सामनावीर पारितोषिक देण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ४ बाद ५५६ घोषित व ४ बाद २६४ घोषित
न्यूझीलंड : ३१७ व २९५ (केन विल्यमसन ५९, ब्रॅन्डन मॅकलम ८०, मार्क क्रेग नाबाद २६, मिचेल स्टार्क २/६९, जोश हॅसेलवुड २/६८, मिचेल मार्श २/२५, नाथन लिऑन ३/६३).