भारताविरूद्धच्या प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय यजमानांच्या अंगलट आला आहे. कारण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव १४० धावांतच गडगडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने पूर्ण ताकदीचा संघ खेळवला मात्र बॉर्डर-गावस्कर मालिका लक्षात घेऊन तिसऱ्या सामन्यात प्रमुख खेळाडूंना आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्णधार पॅट कमिन्ससह, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्नस लबूशेन आणि स्टीव्हन स्मिथ यांना तिसऱ्या वनडेसाठीच्या संघातून विश्रांती देण्यात आली. विकेटकीपर फलंदाज जोश इंगलिसकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. प्रमुख खेळाडूंच्या जागी कूपर कोनेली, मार्कस स्टॉइनस, स्पेन्सर जॉन्सन, लान्स मॉरिस, शॉन अबॉट यांना संघात घेण्यात आलं.

बॉर्डर गावस्कर मालिकेचा पहिला कसोटी सामना ज्या मैदानावर होणार आहे त्याच पर्थच्या खेळपट्टीवर यजमान कांगारुंची दाणादाण उडाली. पाकिस्तानने खेळपट्टीचा नूर ओळखून नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध जेक फ्रेझर मॅकगर्क ७ धावा करुन तंबूत परतला. चेंडू खेळावा की सोडावा या विचारात असताना आरोन हार्डीच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेला इंगलिसही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने ७ धावा केल्या. हारिस रौफने शॉर्टला तंबूत परतावलं. दुखापतीमुळे कोनेलीला मैदान सोडावं लागलं.

अनुभवी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनस यांच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रौफच्या चेंडूवर मॅक्सवेल फसला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मोहम्मद हसनैनने स्टॉइनसला बाद केलं. त्याने ८ धावा केल्या. ८८/६ अशी अवस्था झालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव शॉन अबॉट आणि अॅडम झंपा यांनी सावरला. नसीम शहाने झंपाला बाद करत ही भागीदारी तोडली. त्याने १३ धावा केल्या. अबॉटने बाद होण्यापूर्वी ३० धावांची खेळी केली.

पाकिस्तानतर्फे शाहीन शहा आफ्रिदी आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हारिस रौफने २ तर हसनैनने एक विकेट पटकावली. अवघ्या ३१.५ षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव १४० धावांतच संपुष्टात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia bundled out for 140 runs against pakistan in third one day match prominent players rested for this match as they were preparing for border gavaskar trophy psp