नियमित कर्णधार मायकेल क्लार्कच्या अनुपस्थितीतही शानदार प्रदर्शनासह ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेच्या जेतेपदावर कब्जा केला. मात्र विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात क्लार्क असणे अत्यावश्यक आहे. क्लार्कविना विश्वचषक जिंकणे दिवास्वप्न आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा विख्यात फिरकीपटू शेन वॉर्नने याने व्यक्त केले.  
क्लार्कची नेतृत्वशैली प्रभावी आहे. तो तंदुरुस्त असल्यास सलामीच्या लढतीसाठी त्याचा समावेश करावा. क्लार्कच्या अनुपस्थितीत जॉर्ज बेली कर्णधारपद भूषवील, मात्र क्लार्क संघात परतल्यावर बेली संघाचा भाग नसेल, कारण तंत्रकौशल्याच्या मुद्दय़ावर तो परिपूर्ण नाही. अव्वल दर्जाचे गोलंदाज बेलीला सहज बाद करू शकतात. क्लार्क संघात परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ आणि क्लार्क अशी ऑस्ट्रेलियाची मजबूत फलंदाजी असेल.
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सलामीची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडशी होणार आहे. १९८७, १९९९, २००३ आणि २००७मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाची कमाई केली आहे.

Story img Loader