करोना महामारीच्या काळात टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपनचे आयोजन केले जात आहे. १७ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोठा गदारोळ माजला आहे. नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. २० ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच बुधवारी मेलबर्नला पोहोचला, पण त्याला विमानतळाबाहेर जाऊ दिले नाही. त्याला एक तास विमानतळावर थांबवण्यात आले, त्यानंतर प्रवेशाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला.
जोकोविच वैद्यकीय सवलत मिळविण्यात इतका गुंतला होता, की त्याने त्याच्या व्हिसाकडे पूर्ण लक्ष दिले नाही आणि त्यामुळेच त्याला मेलबर्न विमानतळावर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे सांगितले जात आहे, की जोकोविचकडे लसीकरण प्रमाणपत्र नव्हते आणि तो त्याशिवाय स्पर्धा खेळू इच्छित होता.
एक दिवस आधी, जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली होती, त्याला लसीकरण नियमांमध्ये सूट दिली होती. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणीही कायद्याच्या वरचढ नाही.
हेही वाचा – IND vs SA : ऐकलं का..! ४४ वर्षीय पालेकर यांचं पदार्पण; अंपायर आफ्रिकेचे, पण जन्म महाराष्ट्रातील…
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी ट्विटरवर लिहिले, ”जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम हा नियम असतो. विशेषतः जेव्हा आपल्या सीमेचा प्रश्न येतो. या नियमांच्या वर कोणीही नाही. करोनामुळे जगातील सर्वात कमी मृत्यूदर येथे आहे. आम्ही सतत सतर्क आहोत.”
सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुसिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कते म्हणाले, ”मी जोकोविचशी फोनवर बोललो आहे आणि संपूर्ण सर्बिया त्याच्यासोबत आहे. आमचे अधिकारी जोकोविचची समस्या सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जोकोविच, न्याय आणि सत्यासाठी लढा देईल.”
३४ वर्षीय जोकोविचचे लक्ष विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅमवर आहे. जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या तिघांनीही आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे पटकावली आहेत.