नवी दिल्ली : भारताच्या दौऱ्यासाठी आमच्या संघाने खूप तयारी केली होती. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेरीस आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र, तिसऱ्या दिवशी आम्ही अतिशय निराशाजनक खेळ केला. त्यामुळे आम्ही भारताच्या परीक्षेत नापास झालो असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडॉनल्ड यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने एका धावेची आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची १ बाद ६१ अशी धावसंख्या होती. मात्र, तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ४८ धावांमध्ये ९ गडी गमावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ११३ धावांवर संपुष्टात आला. मग भारताने विजयासाठी मिळालेले ११५ धावांचे आव्हान चार गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडेच राहणार हेदेखील सुनिश्चित झाले.
‘‘दिल्ली कसोटीतील पराभवानंतर आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाणार, आमच्यावर टीका होणार हे अपेक्षितच होते. यात काहीच गैर नाही. दुसऱ्या दिवसअखेरीस आम्ही चांगल्या स्थितीत होतो. आम्ही भारतावर दडपण आणले होते. या मालिकेत पहिल्यांदा भारताला सीमारेषेवर क्षेत्ररक्षक ठेवावे लागले होते. अश्विन बळी मिळवण्याऐवजी धावा रोखण्यासाठी गोलंदाजी करत होता. मात्र, तिसऱ्या दिवशी एका तासातील निराशाजनक कामगिरीमुळे सामना आमच्या हातून निसटला. त्यामुळे आमच्यावर टीका करण्यात आली,’’ असे मॅकडॉनल्ड म्हणाले. ‘‘तिसऱ्या दिवशी आम्ही केलेली कामगिरी पाहता, आम्ही भारताच्या परीक्षेत नापास झालो असे म्हणायला हरकत नाही. दिल्लीची खेळपट्टी फार आव्हानात्मक नव्हती. तुम्ही योग्य तंत्रासह आणि योजनेने फलंदाजी केल्यास तुम्हाला धावा करणे शक्य होते. कोणत्या चेंडूंवर ‘स्वीप’ आणि ‘रिव्हर्स स्वीप’चा फटका मारला पाहिजे व कोणत्या चेंडूंवर हा फटका टाळला पाहिजे, यात समतोल साधणे आवश्यक होते. आमचे फलंदाज यात अपयशी ठरले. आमच्या काही फलंदाजांनी नैसर्गिक खेळ केला नाही,’’ असे मॅकडॉनल्ड यांनी सांगितले.