ऑस्ट्रेलिया २ बाद ४१६
डेव्हिड वॉर्नरने साकारलेल्या पहिल्यावहिल्या द्विशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २ बाद ४१६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. डावखुरा धडाकेबाज फलंदाज वॉर्नरने २७२ चेंडूंत २२ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद २४४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर वॉर्नरने आपल्या फटकेबाजीला प्रारंभ केला. संपूर्ण दिवस खेळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमसुद्धा यावेळी त्याने आपल्या नावावर केला. वॉर्नरने आधी जो बर्न्स (४०) सोबत १०१ धावांची सलामी दिली. मग त्याने उस्मान ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी ३०२ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाने ११ चौकार आणि २ षटकारांनिशी १२१ धावा केल्या. न्यूझीलंडने वॉर्नरला रोखण्यासाठी आठ गोलंदाज वापरले.
वॉर्नरच्या खेळीतील १०० धावा या चौकार-षटकारांनी साकारल्या असल्या तरी बाकीच्या धावांसाठी मात्र त्याला मेहनत घ्यावी लागली. वॉर्नरने पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावली होती. त्यामुळे हे त्याचे सलग तीन कसोटी शतक आहे. ही खेळी साकारताना त्याने चार हजार धावांचा टप्पा ओलांडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा