AFG vs AUS Match Called Off Due to Rain: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलच्या दृष्टीने अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्याचा विजेता संघ ब गटातून चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरणार होता. पण अफगाणिस्तानची फलंदाजी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात १२ षटके होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाचा सामना पाऊस पडल्याने रद्द करण्यात आला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर बराच वेळ थांबून मैदान सामन्यासाठी पुन्हा तयार होते की नाही, याचे पंचांनी निरिक्षण केले. पण लाहोरच्या या मैदानावर प्रचंड पाणी असल्याने सामना रद्द करण्यात आला. भारतीय वेळेनुसार रात्री ९.२० वाजता पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली. या निकालाचा अर्थ ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. त्याचवेळी अफगाणिस्तान संघ अजूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी अफगाणिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता अजूनही कायम आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक ४ गुणांसह पात्र ठरली, तर अफगाणिस्तानचा संघ ३ गुण तर दक्षिण आफ्रिकेचा संघही ३ गुणांसह शर्यतीत आहे. त्यामुळे आता अफगाण संघाला आता उद्या म्हणजेच १ मार्च २०२५ रोजी इंग्लंडने विजय मिळवावा अशी अपेक्षा असेल, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेचा रन रेट कमी होईल आणि टेम्बा बावुमाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरेल.

तत्पूर्वी, पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १२.५ षटकात १ बाद १०९ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड जबरदस्त फॉर्मात होता. त्याने ४० चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५९ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने सामन्यात दणक्यात सुरूवात केली, पण अफगाणिस्तानने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत २७३ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. सदिकउल्ला अटलने ९५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्ला ओमरझाईने वादळी खेळी केली आणि संघाची धावसंख्या २५० पार नेऊन ठेवली. ओमरझाईने ६३ चेंडूत ५ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या.

Champions Trophy B Group Points Table After AUS vs AFG Match Called Off
अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यानंतर ब गटाची गुणतालिका

ब गटात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत, तर बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानकडून पराभूत होऊन इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे त्यांचा कर्णधार जोस बटलरने शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

Story img Loader