ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी यांची कायम चर्चा होत असते. पण त्यांच्या कामगिरीबरोबरच अनेक वादांच्या भोवऱ्यातही खेळाडू सापडले आहेत. कुप्रसिद्ध असलेलं सँडपेपर वादात अडकल्यामुळे काही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलियाचा अजून एक दिग्गज खेळाडू नव्या वादात अडकला आहे.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टुअर्ट मॅकगिलला गुरुवारी (१३ मार्च) कोकेन डीलमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. सिडनी जिल्हा न्यायालयाने ५४ वर्षीय लेग स्पिनरला एप्रिल २०२१ मध्ये ३३०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.८१ कोटी रुपयांच्या एक किलोग्राम कोकेनची डील केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले, परंतु त्याला अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.

ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅकगिलनेच्या शिक्षेची सुनावणी आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयात समोर आले की मॅकगिलने त्याच्या नियमित ड्रग डीलरची त्याचा मेहुण्या, मारिनो सोतिरोपौलोसशी त्याच्या रेस्टॉरंटच्या खाली एका बैठकीत ओळख करून दिली होती. मॅकगिलने व्यवहाराची माहिती नाकारली असली तरी, त्याच्या सहभागाशिवाय हा करार शक्य नसल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला.

स्टुअर्ट मॅकगिल गेल्या वर्षी एका घटनेत सामील होता ज्यामध्ये त्याचे अपहरण झाले होते. मात्र, अपहरण करणाऱ्या दोन भावांनी मॅकगिल स्वत: त्यांच्याकडे येऊन अमली पदार्थांच्या व्यापारात सहभागी असल्याचा दावा केला आहे. मॅकगिल स्वत:हून सिडनीच्या दक्षिण-पश्चिम भागात गेल्याचा आरोप या भावांनी न्यायालयात केला.

स्टुअर्ट मॅकगिलने ऑस्ट्रेलियासाठी ४४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने १८४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७७४ विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्नमुळे तो ऑस्ट्रेलियाकडून जास्त काळ खेळू शकला नाही. कारण त्यावेळी शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचा अव्वल दर्जाचा स्पिनर होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी अखेरचा कसोटी सामना २००८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.