India vs Australia Test Series : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी उभय संघांमध्ये ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ ते १३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे खेळवला जाईल. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वाची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासाठी देखील ही मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दोन भारतीय गोलंदाजांची भीती सतावतेय.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या दोन गोलंदाजांची भीती आहे. या दोन गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने सिडनी येथे एक विशेष खेळपट्टी तयार करून घेतली आहे. ही खेळपट्टी अगदी भारतीय खेळपट्ट्यांसारखी आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना विशेष मदत मिळते. या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जोरदार सराव करत आहेत. या सरावाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

४ कसोटीत ५९ बळी

२०२१ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. उभय संघांमध्ये भारतात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या ४ सामन्यांमध्ये अश्विन आणि अक्षर या दोघांनी मिळून तब्बल ५९ बळी घेतले होते. या दोन गोलंदाजांचा हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन संघाच्या चिंता वाढवणारा आहे.

१८ वर्षांपासून कांगारूंना विजयाची प्रतीक्षा

यासह आणखी एक गोष्ट आहे जी कांगारूंच्या चिंता वाढवतेय, ती म्हणजे २००४ पासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकली नाही. गेल्या १८ वर्षांमध्ये उभय संघांमध्ये भारतात ४ कसोटी मालिका खेळवण्यात आल्या, या सर्व मालिका भारताने जिंकल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एस. भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.

हे ही वाचा >> IND vs AUS Test series: भारत दौरा सुरू होण्यापूर्वी कांगारूंची आरडाओरडा! विश्वास नाही म्हणून सराव सामना…, लावला अजब तर्क

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

पहिली कसोटी – ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी – १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी – १ ते ५ मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी – ९ ते १३ मार्च, अहमदाबाद