Australia vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स ठरला आहे. आजपर्यंत झालेल्या ७ सामन्यांमध्ये अफगाणिस्ताननं ४ सामने जिंकून आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. आज झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाची चारही बाजूंनी कोंडी केली होती. ऑस्ट्रेलियाचा पराभव जवळपास निश्चित मानला जात असताना ग्लेन मॅक्सवेलनं पराभवाच्या दरीतून संघाला फक्त बाहेरच काढलं नाही तर एक दिमाखदार विजय मिळवून देत सेमीफायनलमध्ये अलगद नेऊन ठेवलं. असं करताना ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमधली वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्याही त्यानं नोंदवली. पण २२व्या षटकात मॅक्सवेलला अम्पायरनं बाद दिलं होतं. तो पॅव्हेलियनकडे परतही चालला होता. जर तेव्हा तो मैदानाबाहेर गेला असता, तर त्याची २०१ धावांची ऐतिहासिक खेळी होऊच शकली नसती!
मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या विलक्षण सामन्यामध्ये अफगाणिस्ताननं आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर २९१ धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानच्या या धावसंख्येत झारदानच्या तडाखेबाज शतकाचाही समावेश होता. अफगाणिस्तानच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातीपासूनच घसरगुंडी उडाली. ९१ धावांवर ७ बाद अशी ऑस्ट्रेलियाची दारूण अवस्था झाली होती. त्यामुळे अफगाणिस्तान यंदाच्या विश्वचषकात आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद करणार अशीच शक्यता निर्माण झाली असताना मॅक्सवेलनं तो सामना अफगाणिस्तानच्या हातातून खेचून आणला.
..आणि मॅक्सवेल पॅव्हेलियनकडे निघाला!
मॅक्सवेल वैयक्तिक २७ धावांवर असताना ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या १०१ धावा फलकावर लागल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी आणखी १९१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी नूर अहमदचा एक चेंडू थेट मॅक्सवेलच्या पॅडवर आदळला आणि सगळ्यांनीच आऊटसाठी अपील केलं. अम्पारनंही आऊट दिल्यामुळे मॅक्सवेलसह ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डगआऊट स्तब्ध झाला. शेवटी मॅक्सवेलनं डीआरएसची मागणी करून शेवटची संधी घ्यायचं ठरवलं.
तिकडे ऑस्ट्रेलियाच्या डगआऊटमध्ये पूर्णपणे शांतता असताना इकडे मोठ्या स्क्रीनवर थर्ट अम्पायर रिप्ले बघण्यात व्यग्र होते. स्क्रीनवर चेंडूचा टप्पा स्टम्पच्या लाईनमध्ये पडल्याचं पाहून मॅक्सवेलच्या आशा मावळल्या होत्या. त्यानं पॅव्हेलियनच्या दिशेनं चालायला सुरुवातही केली होती. पण चेंडू टप्पा पडून जसा स्टम्पपर्यंत पोहोचला, तसं मॅक्सवेलसकट संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मॅक्सवेल तसाच उलटा फिरला आणि पुन्हा क्रीजवर येऊन उभा राहिला. कारण चेंडूची उंची जास्त असल्यामुळे तो बाद नसल्याचा निर्णय थर्ड अम्पायरनं दिला आणि सगळ्याच ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांच्या जिवात जीव आला.
या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर मॅक्सवेलला मिळालेलं हे जीवदान किती मोलाचं होतं, याची जाणीव सगळ्यांनाच होत असल्याचं दिसून येत आहे.