शेवटचे एक मिनिट बाकी असताना ट्रेंट मिटॉनने केलेल्या गोलमुळेच ऑस्ट्रेलियाने यजमान मलेशियाला ३-२ असे हरविले आणि अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सातव्यांदा अजिंक्यपद मिळविले.
चुरशीने झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून निकोलस बुडजीन (२९व्या मिनिटाला), क्रेग ब्राऊनी (३०व्या मिनिटाला) व मिटॉन (६९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. मलेशियाकडून फैजल सरी (पाचव्या मिनिटाला) व तेंगफु अहमद ताजुद्दीन (४९व्या मिनिटाला) यांनी गोल नोंदविले. पूर्वार्धात ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी घेतली होती. मलेशियाला एकदाही विजेतेपद मिळविता आलेले नाही. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाने न्यूझीलंड संघावर २-१ असा रोमहर्षक विजय नोंदविला.
भारताची पाचव्या स्थानी मजल
भारताने या स्पर्धेतील शेवटचे स्थान मिळविण्याची नामुष्की टाळली. त्यांनी पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पाकिस्तानला ४-२ असे पराभूत केले.
भारताच्या या विजयाचे श्रेय रूपींदरपालसिंग याला द्यावे लागेल. त्याने नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा व ६२ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकद्वारा गोल केला. आकाशदीपसिंग (३५ वे मिनिट) व मलकसिंग (४४ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.
पाकिस्तानकडून महंमद इम्नान (सातवे मिनिट) व काशिफ सईद (४६ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.