विश्वविजेतेपदाचे दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने चेन्नईत भारतासमोर तर लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर सपशेल नांगी टाकली. या दोन पराभवांनंतर पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयांवरही टीका होत आहे. वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने पॅट कमिन्सच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. पण पॅट कमिन्सचा वनडेतला कर्णधारपदाचा अनुभव फक्त ४ सामन्यांचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर फायदा उठवत ३११ धावांचा डोंगर उभारला. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा डाव १९९ धावांतच गडगडला. भारतीय संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं होतं.
वर्ल्डकप स्पर्धेत नेहमीच दमदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दोन सामन्यातला खेळ क्रिकेटरसिकांना चक्रावून टाकणारा आहे. राजधानी दिल्लीची खेळपट्टी फलंदाजीसाठी आदर्श अशी असताना नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारा होता.

वर्ल्डकपसाठी संघनिवड झाली तेव्हा पॅट कमिन्सने ७७ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यापैकी फक्त ४ सामन्यात कमिन्सने नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. हे चारही सामने गेल्या वर्षी झाले आहेत. वनडेत कर्णधारपदाचा त्रोटक अनुभव असलेल्या खेळाडूला कर्णधारपदी नेमणं खरंच योग्य होतं का असा सवाल आता क्रिकेटरसिकांमध्ये चर्चिला जातोय.

आणखी वाचा: नेदरलँड्स संघातली ‘भारतीय’ कुमक- विक्रमजीत, तेजा आणि आर्यन

१८वर्षीय पॅट कमिन्सने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. पदार्पणातच कमिन्सने ७ विकेट्स पटकावत सामनावीर पुरस्कार पटकावला. कमिन्सच्या खणखणीत कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने जोहान्सबर्ग कसोटीत २ विकेट्सनी विजय मिळवला. कमिन्सने त्याच वर्षी वनडे पदार्पणही केलं. पण गंभीर अशा पाठीच्या दुखण्यामुळे पुढची कसोटी खेळायला सहा वर्ष लागली. वनडेत कमिन्स थोडं थोडं खेळत राहिला पण दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे संघात स्थिरावू शकला नाही. कमिन्सची वनडेतली कामगिरी चांगली आहे पण कसोटीइतके आकडेवारी भेदक नाही. कसोटी प्रकारात कमिन्सने २१ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व सांभाळलं आहे पण वनडेत मात्र फक्त ४ सामन्यात त्याने कांगारुची कमान सांभाळली.

वर्ल्डकप कर्णधारांकडे नेतृत्वाचा अनुभव किती?

वनडे कारकीर्दीत कमिन्स, जॉर्ज बेली (४), मायकेल क्लार्क (७), आरोन फिंच (३६) आणि स्टीव्हन स्मिथ (२६) यांच्या नेतृत्वात खेळला. २०१८ मध्ये सँडपेपरगेट प्रकरणानंतर स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांना बंदीला सामोरं जावं लागलं. संघाची धुरा विकेटकीपर फलंदाज टीम पेनकडे सोपवण्यात आली. कामगिरीत सातत्याचा अभाव, संघाच्या कामगिरीत घसरण आणि एका महिलेला उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणीमुळे टीम पेनला कर्णधारपद सोडावं लागलं. यानंतर कमिन्सकडे कर्णधारपद देण्यात आलं. कसोटी प्रकारात कमिन्सच्या नेतृत्वातील २१ सामन्यांपैकी ११ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजय संपादला पण ५ मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं तर ५ कसोटी अनिर्णित झाल्या. वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारातून कर्णधार आरोन फिंचने निवृत्ती स्वीकारल्यामुळे कर्णधार कोण असा प्रश्न उभा राहिला. दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंट यामुळे कमिन्सकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार का याबद्दल साशंकता होती. पण निवडसमितीने कमिन्सच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवला.

आणखी वाचा: रेफ्युजी कॅम्पमधून सुरुवात, भारतात होम ग्राऊंड, देशात तालिबानी राजवट-अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंची संघर्षमय वाटचाल

ऑस्ट्रेलियाने तब्बल पाचवेळा वर्ल्डकपचा झळाळता चषक नावावर केला आहे. यंदाही ते जेतेपदाचे दावेदार आहेत पण सध्याची ऑस्ट्रेलियाची कामगिरी बघता वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचा कर्णधारपदाचा अनुभव पाहिला तर कमिन्स सगळ्यात अनुनभवी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे ८६ सामन्यात नेतृत्वाचा अनुभव आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने २३ तर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही १९ सामन्यात नेतृत्व केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अतिशय नाममात्र अनुभव असलेल्या संघांच्या कर्णधारांकडेही नेतृत्वाचा जास्त अनुभव आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात स्मिथसारखा अनुभवी खेळाडू आहे. ५५ वनडे लढतीत स्मिथने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या अनुभवाकडेही दुर्लक्ष केलं आहे. वॉर्नरनेही ३ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएलमधल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा पटकावली आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही दोन वर्ष चालणारी स्पर्धा आहे. वनडे वर्ल्डकपचं प्रारुप सर्वार्थाने वेगळं आहे. अॅलन बॉर्डर, स्टीव वॉ, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क या विश्वविजेत्या कर्णधारांच्या मांदियाळीत सामील होण्यासाठी कमिन्सला प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia has appointed pat cummins as captain for the world cup despite inexperience psp
Show comments