Australia head coach Andrew MacDonald on David Warner : डेव्हिड वॉर्नरने त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मार्कस हॅरिसचे नाव सुचवले आहे. वार्नरच्या या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड संतापले आहेत.ते म्हणाले की ते अधिक पर्यायांवर विचार करत असून त्यामध्ये कॅमेरॉन ग्रीनचा देखील समावेश आहे. ३ जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या वक्तव्यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक संतापले –
डेव्हिड वॉर्नरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी अनेक नावांचा विचार केला जात आहे. मार्कस हॅरिस, कॅमेरॉन ग्रीन, मॅट रेनशॉ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांची नावे चर्चेत आहेत. अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘डेव्हिड वॉर्नर हा निवडकर्ता नाही. मागच्या वेळी त्याने मॅट रेनशॉचे नाव घेतले आणि कदाचित पुढचे नाव कॅम बॅनक्रॉफ्ट आणि नंतर कॅमेरॉन ग्रीन असेल.’
अँड्र्यू मॅकडोनाल्डने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले, ‘पण ही चांगली गोष्ट आहे की तो अशाप्रकारे सहकारी खेळाडूला सपोर्ट करत आहे, त्याला त्याचे मत विचारण्यात आले आणि त्याने आपले मत दिल्याने आम्हाला आनंद झाला.’ ऑस्ट्रेलियाला आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचे आहे. त्यापूर्वी निर्णय घेतला जाईल, असे प्रशिक्षक म्हणाले. अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी असेही सांगितले की डेव्हिड वॉर्नर यूएईंमध्ये आयएल टी-२० खेळण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० खेळणार नाही.
हेही वाचा – INDW vs AUSW : कोण आहे श्रेयंका पाटील? टीम इंडियासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केले पदार्पण
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकली –
मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. यासह कांगारू संघाने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता मेलबर्नमधील दुसरा कसोटी सामना ७९ धावांनी जिंकून त्यांनी एक सामना शिल्लक असताना मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारी २०२४ पासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.