ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्क याने शेन वॉटसनसोबत चौथ्या विकेटसाठी केलेली १९४ धावांची भक्कम भागीदारीही आणि तळाच्या फलंदाजांना साथीला घेत मिचेल जॉन्सनने साकारलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भक्कम धावसंख्या उभारून श्रीलंकेसमोर ३०४ धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, त्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेचे फलंदाज एकामामागोमाग तंबूत परतल्याने ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर एक डाव आणि २०३ धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे.
तिस-या दिवशी ३०४ धावांचे लक्ष गाठताना श्रीलंकेची अवस्था पहिल्या दोन षटकांत ३ बाद ३ अशी झाली होती. अखेर १०६ धावांवर श्रीलंकेचा दुसरा डाव संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशीच कसोटी आपल्या खिशात घातली. विशेष म्हणजे श्रीलंकेकडून प्रसन्ना जयवर्धने आणि चानका वेलगेदरा यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही.
पहिल्या दिवशी चार बळी घेत श्रीलंकेचा डाव १५६ धावांत गुंडाळण्याची किमया साधणाऱ्या जॉन्सनने गुरुवारी जिद्दीने फलंदाजी करीत सहा चौकारांच्या सहाय्याने ७३ धावा काढल्या होत्या. तसेच क्लार्कने आपल्या कसोटी कारकीर्दीमधील २२वे शतक साजरे केले. याचप्रमाणे वर्षभरात सर्वाधिक धावा काढणारा ऑस्ट्रेलियन फलंदाजही क्लार्क ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा