श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ३०० धावांचा टप्पा ओलांडत ४८ धावांची अल्प आघाडी मिळवली आहे. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेला २९४ धावांत गुंडाळल्यानंतर शुक्रवारी मोठी आघाडी घेण्याचे ऑस्ट्रेलियाचे मनसुबे होते. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी नियमित अंतरात विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळू दिली नाही.
सलामीवीर इड कोवान चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि फिलीप ह्य़ुजेस यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली.
शतकाकडे कूच करणाऱ्या वॉर्नरला दिलशानने बाद केले. त्याने १० चौकारांसह ८५ धावा केल्या. वॉर्नरपाठोपाठ ह्य़ुजेसही तंबूत परतला. ९ चौकारांसह त्याने ८७ धावांची खेळी केली. मायकेल क्लार्क आणि माइक हसी या अनुभवी जोडीने डाव सावरला. मात्र नाहक चोरटी धाव घेण्याचा हसीचा प्रयत्न फसला. त्याने २५ धावा केल्या. अर्धशतक करून स्थिरावलेला क्लार्क मोठय़ा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मायकेल वेडने एकाकी लढत दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३४२ धावा झाल्या आहेत. वेड ४७ तर पीटर सिडल १६ धावांवर खेळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा