वृत्तसंस्था, मेलबर्न
प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून सलामीवीराच्या स्थानासाठी नेथन मॅकस्वीनीच्या जागी १९ वर्षीय सॅम कोन्सटासची निवड करण्यात आली आहे.
भारताविरुद्धच्या या मालिकेतच आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेल्या मॅकस्वीनीला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळणाऱ्या मॅकस्वीनीला सलामीला पाठविण्यात आले. मात्र, विशेषत: जसप्रीत बुमराच्या भेदकतेसमोर तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्याला तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावांत केवळ ७२ धावा करता आल्या. त्याने अनुक्रमे १०, ०, ३९, नाबाद १०, ९ आणि ४ धावा अशी कामगिरी केली. त्यामुळे त्याला डच्चू देत कोन्सटासला ऑस्ट्रेलियाच्या स्थान देण्याचा निवड समितीने निर्णय घेतला आहे. अखेरचे दोन सामने मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर) आणि सिडनी (३-७ जानेवारी) येथे होणार आहेत.
मेलबर्न कसोटीत पदार्पणाची संधी मिळाल्यास कोन्सटास हा कर्णधार पॅट कमिन्स (१८ वर्षे १९३ दिवस) याच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा सर्वांत युवा खेळाडू ठरेल.
हेही वाचा >>>IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी
कोन्सटास गेल्या काही महिन्यांपासून बराच चर्चेत आहे. त्याने न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना ऑस्ट्रेलियातील प्रथमश्रेणी स्पर्धा ‘शेफिल्ड शिल्ड’च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनही डावांत शतक साकारले होते. त्यामुळे त्याला भारत ‘अ’विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात स्थान मिळाले. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ७३ धावांची खेळी केली. पाठोपाठ भारतीय कसोटी संघाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश संघाकडून खेळताना ९७ चेंडूंत १०७ धावा फटकावल्या. त्यामुळेच त्याची कसोटी संघात निवड झाली आहे.
‘‘कोन्सटासला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याची फलंदाजीची शैली इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्याचा खेळ कसा बहरत जातो हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत,’’ असे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले.
रिचर्डसनचे पुनरागमन
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पायाच्या दुखापतीमुळे अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे जाय रिचर्डसन आणि शॉन अॅबट यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. रिचर्डसनने अखेरचा कसोटी सामना २०२१-२२ च्या अॅशेस मालिकेत खेळला होता.
दोन उपकर्णधार
ऑस्ट्रेलियाने कसोटी संघासाठी दोन उपकर्णधार निवडण्याची प्रथा कायम ठेवताना स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याकडे संयुक्तपणे ही जबाबदारी सोपवली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ऑस्ट्रेलिया दोन उपकर्णधारांची निवड करत आहे.
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कोन्सटास, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, नेथन लायन, शॉन अॅबट, जाय रिचर्डसन, जोश इंग्लिस, ब्यू वेबस्टर.