Champions Trophy Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या या स्पर्धेसाठी संघ जाहीर केले असले तरी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसत आहे. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला असून आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. त्याच्या बदलीची घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियानेही मिचेल मार्श चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नसल्याचे म्हटले आहे.

३३ वर्षीय मिचेल मार्शला पाठीला दुखापत झाली असून त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. आता तो २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणार नाही. मार्श संघाबाहेर पडणं हा संघासाठी मोठा धक्का आहे, कारण मार्श एक अष्टपैलू खेळाडू असल्याने संघात समतोल राखता येतो. मार्शने बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो जे संघासाठी महत्त्वाचे ठरते.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानसह स्थान मिळाले आहे. तर अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना २२ फेब्रुवारीला इंग्लंडशी होणार आहे. दुसरा सामना २५ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेसह तर तिसरा सामना २८ फेब्रुवारीला अफगाणिस्तानशी होणार आहे.

मार्शने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ६५०६ धावा केल्या आहेत, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ४५० विकेट्स घेतल्या आहेत. मार्शने आपल्या देशासाठी ४६ कसोटी, ९३ वनडे आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो आपल्या संघासाठी महत्त्वाचा ठरला आहे. तर फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २७९४ धावा केल्या असून ५७ विकेट्सही घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia mitchell marsh ruled out of champions trophy 2025 due to back injury bdg