तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध सलामीचा फलंदाज आरोन फिंचला ऑस्ट्रेलियाचा ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. कसोटी कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जॉर्ज बेलीने ट्वेन्टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
‘देशाचे प्रतिनिधित्त्व करायला मिळणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. मला कर्णधारपद मिळेल याची अपेक्षाच केली नव्हती. मायकेल क्लार्क आणि जॉर्ज बेली यांच्या नेतृत्त्वाखाली खेळण्याची मला संधी मिळाली. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो आहे’, असे फिंचने सांगितले.
फिंचने १८ ट्वेन्टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व केले असून, ४१.२५ च्या सरासरीने ६६० धावा केल्या आहेत. फिंचने आयपीएल स्पर्धेत पुणे वॉरियर्सचे नेतृत्त्व केले आहे.
पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी ओकीफेला संधी
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात फिरकीपटू स्टीव्हन ओ कीफे याला संधी देण्यात आली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू मिचेल मार्शलाही या संघात समाविष्ट करण्यात आले आहे. फिलीप ह्य़ूजेस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी या संघात स्थान पटकावले आहे. एकदिवसीय संघात सीन एबॉट हा एकमेव नवा चेहरा आहे. ट्वेन्टी-२० संघात कॅमेरुन बॉयस या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीत दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. ५ ऑक्टोबरला ट्वेन्टी-२० लढतीने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.