David Warner dropped from T20 squad : ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमस्वरूपी निवृत्ती घेतल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळेच पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. वॉर्नरने गेल्या वर्षीच पुष्टी केली होती की टी-२० विश्वचषक २०२४ ही त्याची शेवटची स्पर्धा असेल. कारण त्याने जानेवारी २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता.
डेव्हिड वॉर्नर त्याचा शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना २०२३ विश्वचषक अंतिम सामना होता. मात्र, बोर्डाची इच्छा असेल तर तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास तयार आहे, असे त्याने अनेकदा सांगितले होते, परंतु आता मुख्य निवडकर्ता यांनी त्याच्या नावाचा विचार केला नाही. खरं तर, त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट गेल्या महिन्यात टी-२० विश्वचषकात झाला. टी-२० विश्वचषकात त्याची आणि त्याच्या ऑस्ट्र्रेलियन संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती.
डेव्हिड वॉर्नरची काही दिवसांपूर्वीची इन्स्टा पोस्ट –
यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टावर लिहिले होते, “मी काही काळ फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहिन. जर माझी संघात निवड झाली तर मी ऑस्ट्रेलियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास तयार आहे.” तथापि, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ता आणि माजी क्रिकेटपटू जॉर्ज बेली यांनी पुष्टी केली आहे की वॉर्नर ऑस्ट्रेलिया व्यवस्थापनाच्या योजनेत नाही. कारण आम्ही स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.
जॉर्ज बेली काय म्हणाले?
ईएसपीएनक्रिकइंफोच्या अहवालानुसार जॉर्ज बेलीने सांगितले की, “आमची समजूत अशी आहे की डेव्हिड निवृत्त झाला आहे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या अविश्वसनीय कारकिर्दीबद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे. अर्थातच, आमची योजना अशी आहे की तो पाकिस्तानमध्ये असणार नाही. तुम्ही हे समजू शकत नाही की तो कधी मजाक करत आहे. त्याची कारकीर्द दमदार राहिली आहे, त्याने याचा आनंद साजरा केला पाहिजे. जसजसा काळ पुढे जाईल तसतसे त्याने ऑस्ट्रेलियासाठी जे काही केले आहे आणि त्याचा वारसा लक्षात राहील.”
हेही वाचा – IND vs ZIM T20I : शुबमन गिलने रोहित शर्माला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
मुख्य निवडकर्ता पुढे म्हणाला, “ऑस्ट्रेलिया संघाबद्दल बोलायचे, तर काही वेगवेगळ्या खेळाडूंसह बदलाचा प्रवास हा तिन्ही फॉरमॅटमध्ये रोमांचक असणार आहे.” ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाची निवड केली असून त्यात काही नवीन आणि तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कलाही संघात स्थान देण्यात आले आहे.