ICC Test Team Rankings Announced India Drop In Test Rankings : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने इतिहास रचला. या मैदानावर यजमान संघाला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले आहे. असे असतानाही टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गमावले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारत-दक्षिण आफ्रिका मालिका अनिर्णित राहण्याचा फायदा झाला. त्याने पुन्हा अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर कांगारू संघ काही काळ अव्वल स्थानावर राहिला होता. आयसीसी क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ११८-११८ रेटिंगसह बरोबरीत होते. खात्यात जास्त गुण असल्यामुळे टीम इंडिया अव्वल स्थानावर होती.
भारताचे गुण जास्त आहेत, पण रेटिंग कमी –
ताज्या आयसीसी रेटिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे ११८ रेटिंग आहे. त्याच्या खात्यात ३५३४ गुण आहेत. त्याचबरोबर मालिका अनिर्णित राहिल्याने भारताला एका मानांकनाचे नुकसान झाले आहे. टीम इंडिया ११७ रेटिंग आणि ३७४६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. इतर संघांच्या क्रमवारीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा – MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधींची फसवणूक! माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
भारताला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी –
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीत विजय मिळवून कांगारू संघ आपले अव्वल स्थान मजबूत करू शकतो. त्याचबरोबर मायदेशात इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.