ICC Women’s T20 World Cup 2023 Prize Money: ऑस्ट्रेलिया संघाने महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत रविवारी सहाव्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर सलग सात वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिसलेला ऑस्ट्रेलियन संघ सहा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. अशा परिस्थितीत, जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला विजेतेपद जिंकल्यानंतर किती बक्षीस रक्कम मिळाली ते पाहूया? अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला विजेतेपदाचा मुकुट देण्यात आला आणि कोणत्या खेळाडूला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले?

कांगारूंना मिळाले ८.२७ कोटी रुपये –

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२३ ची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. या स्पर्धेत एकूण रु. २०.२८कोटी (US$24.5 दशलक्ष) पणाला लागले होते, जे संघांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे दिले जाणार होते. अशा परिस्थितीत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८.२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला ४.१३ कोटी रुपये मिळाले.

उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला १.७३ कोटी रुपये दिले गेले. ग्रुप टप्पा पार करू न शकलेले संघही रिकाम्या हाताने घरी परतले नाहीत. २४.८३ लाख रुपयांव्यतिरिक्त, सर्व संघांना गट सामने जिंकण्यासाठी प्रति सामना १४.४८ लाख रुपये मिळाले आहेत. त्यानुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह परतला आहे.

हेही वाचा – Women’s T20 WC 2023: शबनिम इस्माईलने रचला इतिहास; टी-२० विश्वचषकात घेतल्या तब्बल ‘इतक्या’ विकेट

बेथ मुनी अंतिम फेरीतील सामनावीर ठरली –

जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मुकुट सलामीवीर बेथ मुनीच्या डोक्यावर सजला. संपूर्ण स्पर्धेत शानदार फलंदाजी करणाऱ्या मुनीने अंतिम फेरीत सर्वोत्तम खेळी केली. तिने ५३ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी करत संघाला २० षटकात १५६ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या या धडाकेबाज खेळीमध्ये मुनीने ९ चौकार आणि १ षटकार मारला. टी-२०विश्वचषकाच्या इतिहासात सलग दोन फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी मूनी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. या शानदार खेळीसाठी तिला अंतिम फेरीतील सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा – AUSW vs SAW: बेथ मुनीने फायनल सामन्यात रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली खेळाडू

ऍशले गार्डनरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला –

संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ऍशले गार्डनरला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तिने टी-२० विश्वचषक २०२३ मध्ये ११० धावा करत १० विकेट्स घेतल्या आणि देशबांधव मेगन शुट नंतर टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू होती. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन ११ विकेट्ससह स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. ऍशले गार्डनरने पर्ल येथे न्यूझीलंडविरुद्ध १२ धावांत ५ बळी घेतले. ही या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी ठरली.

महिला टी-२० विश्वचषक २०२३ पुरस्कारांची यादी –

सामनावीर (अंतिम) बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया): ७४* धावा
टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ऍश गार्डनर (ऑस्ट्रेलिया): ११० धावा आणि १० विकेट्स
सर्वाधिक धावा – लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका): २३० धावा
सर्वाधिक बळी – सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड): ११ बळी
सर्वोच्च धावसंख्या – मुनीबा अली (पाकिस्तान): १०२ धावा
सर्वोच्च फलंदाजी स्ट्राइक रेट – आयशा नसीम (PAK): १८१.४८
सर्वाधिक षटकार – लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका): ५
सर्वाधिक चौकार – नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड): २८
सर्वाधिक अर्धशतक – लॉरा वूलवर्ड आणि बेथ मुनी: ३
सर्वोत्तम गोलंदाजी – अॅश गार्डनर (ऑस्ट्रेलिया): ५/१२

Story img Loader