भारत दौऱ्यातील दारुण पराभव आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सुमार कामगिरी या पाश्र्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांना अ‍ॅशेस मालिका सुरू होण्याच्या १६ दिवसआधीच डच्चू दिला आहे. त्यांच्या जागी डॅरेन लेहमन यांची निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे ४५ वर्षीय ऑर्थर हे ऑस्ट्रेलियाचे पहिले विदेशी प्रशिक्षक होते. नोव्हेंबर २०११मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीत झालेली तीव्र घसरण आणि खेळाडूंकडून वारंवार होणारे शिस्तभंग या गोष्टी ऑर्थर यांच्या हकालपट्टीला कारणीभूत ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या भल्यासाठी हा अवघड निर्णय घेतल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले. क्वीन्सलँड संघाचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या लेहमन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, कर्णधार मायकेल क्लार्कने निवड समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.