ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारुंनी विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या संघाने दिलेलं २४४ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात पूर्ण करत इतिहासात आपली नोंद केली आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्टीलने १०५ तर त्याचा सलामीवीर साथीदार कॉलिन मुनरोने ७६ धावांची खेळी केली. मात्र या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन आणि अँड्रू डाय या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानेही आपल्या डावाची आक्रमक पद्धतीने सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि डार्सी शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. वॉर्नरने ५० तर शॉर्टने ७६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा संघ सामन्यात पुनरागमन करेलं अशी सर्वांना आशा होती. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचं सामन्यातलं आव्हान कायम ठेवलं. अखेर अॅरोन फिंचने मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड २० षटकांत २४३/६, मार्टिन गप्टील १०५, कॉलिन मुनरो ७६. केन रिचर्डसन २/४०, अँड्रू टाय २/६४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया डार्सी शॉर्ट ७६, डेव्हिड वॉर्नर ५९. इश सोधी १/३५, ट्रेंट बोल्ट १/४२. निकाल – ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

Story img Loader