स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट या तिघांवर बॉल टॅम्परिंग प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यात स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आलीये. पण वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवूनच ही कारवाई केली गेली की काय अशी शंका उपस्थित होते. वर्ल्ड कप ३० मेला सुरु होतोय. त्यामुळे ते वर्ल्ड कप खेळू शकतील याच हिशोबाने ही बंदी घातल्याचा संशय घ्यायला जागा आहे.

आत्तापर्यंत बॉल कुरतडल्याचे आरोप सचिन तेंडुलकरसह अनेकांवर झालेत. ख्रिस प्रिंगल, मायकेल आर्थरटन, वकार युनूस, शाहीद आफ्रिदी व शोएब अख्तरसारख्या अनेक खेळाडूंवर बॉल कुरतडल्याचे आरोप झाले. काही जणांना काही सामन्यांची बंदी बोगावी लागली तर काहींच्या मानधनात 30 ते 70 टक्क्यांची कपात करण्यात आली. या सगळ्यांना स्मिथ व वॉर्नरच्या तुलनेत कमी शिक्षा भोगाव्या लागल्या. परंतु या सगळ्यांमध्ये असलेला एक समान धागा म्हणजे यातलं कोणी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखं पकडलं गेलं नव्हतं. ऑस्ट्रेलियाचं कृष्णकृत्य केवळ कॅमेऱ्यात कैद झालं असं नाही तर संघाच्या रणनीतीचा एक भाग म्हणून बॉल टँपरिंग केलं गेलं. काहीही करा पण जिंका असं सगळे विधीनिषेध बाजुला ठेवून जेव्हा खेळाच्या मूळ गाभ्याला धक्का पोचतो, खिलाडू वृत्तीला ग्रहण लागतं त्यावेळी तो केवळ बॉल कुरतडल्याचा सामान्य गुन्हा राहत नाही तर ते कर्णधार उपकर्णधारांनं केलेलं संगनमत ठरतं आणि त्यामुळेच जास्त शिक्षा मिळणं आवश्यक होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं एक वर्षाची म्हणजे आधीच्या शिक्षांच्या तुलनेत कठोर शिक्षा दिल्याचा आविर्भाव आणलाय परंतु वर्ल्ड कपसाठी दोघेही पात्र असतील असंही बघितल्याचं दिसत आहे, एकप्रकारे ही सेटिंगच म्हणायला हवी.

ऑस्ट्रेलियाचा विजयी इतिहास

खरंतर ऑस्ट्रेलियाने १९९९ पासून २००७ पर्यंत क्रिकेटमधला सुवर्णकाळ अनुभवला. जून १९९९ पासून ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला सुरुवात झाली. साडेआठवर्षांच्या या काळात ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप विजेतेपदाची हॅटट्रीक पूर्ण केली. खरतर ऑस्ट्रेलियाला १९९९ चा वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा होता तो स्टीव्ह वॉ चा. पण याच स्टीव्ह वॉ ला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २००३ च्या वर्ल्डकप आधी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि रिकी पाँटिंगला वनडे संघाचे कर्णधार बनवले. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरला पर्याय सापडला तर या दोघांचा ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात स्थान मिळणे कठिण आहे. १९९९ ते २००७ या काळात ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅग्राथ, ब्रेट ली, हेडन, गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, डेमियन मार्टिन, सायमंडस असे एकाहून एक रथी महारथी खेळाडू होते. त्यांच्या नावाचा जागतिक क्रिकेटमध्ये एक दबदबा होता.

तर सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ, वॉर्नर, मिचेल स्टार्क, मॅक्सवेल ही चार-पाच नावे सोडल्यास मोठा खेळाडू नाही. तसेच आता ऑस्ट्रेलियाचा तो दबदबा राहिलेला नाही. ऑस्ट्रेलियाला सहज हरवता येते हे भारताने अनेकदा दाखवून दिले आहे.
पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होणार असून ती १४ जुलै पर्यंत रंगणार आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा बाळगायची असेल तर स्मिथ व वॉर्नरची गरज भासेल हे ही उघड आहे. आणि बंदीचा कालावधी पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठी या तिघांचा पर्याय उपलब्ध असेल, याची दक्षता घेतल्याचे दिसते.

Story img Loader