Australia Team Announced: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघात स्थान मिळू शकले नाही. त्याचबरोबर मधल्या फळीतील फलंदाज टीम डेव्हिडचाही संघात समावेश नाही. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांची निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १८ खेळाडूंचा एक प्राथमिक संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज नॅथन एलिस, अष्टपैलू अॅरॉन हार्डी आणि युवा फिरकी गोलंदाज तनवीर यांचा समावेश होता. मात्र, बुधवारी जाहीर झालेल्या संघात या खेळाडूंना स्थान मिळवता आलेले नाही. जरी आता त्यांना संघात स्थान मिळाले नसले तरी टीममध्ये बदल करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे २७ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर केला होता. मात्र, निवडलेल्या मुख्य संघातून तीन खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
शॉन अॅबॉट विश्वचषक पदार्पणासाठी सज्ज आहे
दरम्यान, आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १५ जणांच्या संघात निवड झाल्यामुळे स्टार गोलंदाज शॉन अॅबॉट त्याच्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक खेळणार आहे. जोश इंग्लिसचा बॅकअप यष्टिरक्षक आणि अतिरिक्त फलंदाजीचा पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे. आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी ऑस्ट्रेलियाला प्लेईंग ११साठी ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शमधून सलामीवीरांची निवड करावी लागेल. २७ सप्टेंबरपर्यंत या संघात बदल केले जाऊ शकतात, त्यानंतर आयसीसीची परवानगी आवश्यक असेल.
विश्वचषकापूर्वी टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया भारतात मालिका खेळणार आहे
विश्वचषक २०२३पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने २२, २४ आणि २७ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या मालिकेदरम्यान दोन्ही संघांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीची कसोटी लागणार आहे. तर, जगाबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत ८ ऑक्टोबरला होणार आहे.
विश्वचषक २०२३ ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.