Champions Trophy 2025 Australia squad will change : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या ५ खेळाडूंनी संघाचा तणाव खूप वाढवला आहे. ज्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल मार्श, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, कॅमेरुन ग्रीन आणि मार्कस स्टॉइनिस हे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर आहेत. मार्कस स्टॉइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाला करावे लागतील ५ बदल –

कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृतपणे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर घोषित केले आहे. टीम इंडियासोबत खेळलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हे दोन्ही खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाहीत. कमिन्स घोट्याच्या दुखापतीशी झुंजत असताना, हेझलवूड दुखापतीतून सावरू शकला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया संघात या पाच खेळाडूंच्या जागी कोणाला संधी मिळते हे पाहायचे आहे.

ऑस्ट्रेलियन संघ निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले की, “दुर्दैवाने पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श दुखापतींशी झुंजत आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेळेत सावरु शकले नाहीत. हे निराशाजनक असले तरी, इतर खेळाडूंना जागतिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी असेल.”

मार्कस स्टॉइनिसने केले आश्चर्यचकित –

दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १३ दिवस आधी मार्कस स्टॉइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आश्चर्यचकित केले. स्टॉइनिस म्हणाला की, त्याला टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि हीच त्याच्यासाठी योग्य वेळ आहे. स्टॉइनिसने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तो यंदा आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि ॲडम झाम्पा.