सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला अजिंक्य रहाणेने दिलेली खंबीर साथ या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत, मालिका ४-१ अशा फरकाने खिशात घातली. बंगळुरुच्या सामन्याचा अपवाद वगळता सर्व सामन्यांवर भारताने आपलं वर्चस्व गाजवलं. चांगली सुरुवात होऊनही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये केलेला टिच्चून मारा हा भारतीय गोलंदाजीचं वैशिष्ट्य ठरला.

ऑस्ट्रेलियाने दिलेलं हे आव्हान भारताने रोहित आणि अजिंक्यच्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पार केलं. नागपूरच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात तब्बल १३ विक्रमांची नोंद करण्यात आली.

१ – भारतात सर्वात जलद २ हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे. सौरव गांगुलीच्या नावे असलेला विक्रम रोहितच्या नावे जमा झाला आहे. सौरवने ४५ डावांमध्ये २ हजार धावा केल्या होत्या, रोहित शर्माने ४२ डावांमध्येच हा विक्रम केला आहे.

१ – आपल्या वन-डे कारकिर्दीत पहिल्यांदाच केदार जाधवने आपल्या १० षटकांचा कोटा पूर्ण केला.

१ – उप-खंडातील एखाद्या संघाने ऑस्ट्रेलियाला ४ वन-डे सामन्यांमध्ये हरवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

२ – एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधीक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने आतापर्यंत ५४ षटकार ठोकले आहेत. रोहितच्या पुढे पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ६३ षटकार खेचले आहेत.

२ – सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा दुसरा सलामीवीर ठरला. ८३ डावांमध्ये रोहितने ही किमया साधली आहे. रोहितच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे. हाशिमने ७९ डावांमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

३ – सलग ३ शतकी भागीदारी करणारी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ही भारताची सलामीची तिसरी जोडी ठरली आहे.

३ – सर्वात जलद ६ हजार धावा पूर्ण करणाऱ्या भारतीयांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर. या यादीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर तर माजी कर्णधार सौरव गांगुली दुसऱ्या स्थानावर आहे.

४ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेचं सलग चौथं अर्धशतक. याआधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या भारतीय खेळाडूंनाच हा विक्रम साधता आला आहे.

५ – सलग ३ वन-डे सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करण्याची रोहित शर्माची ही पाचवी वेळ ठरली.

६ – रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे सहावं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरच्या नावे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधीक शतकांचा (९ शतकं) विक्रम आहे.

८ – एका कॅलेंडर वर्षात शतकी भागीदारी करण्याची भारतीय संघाची ही आठवी वेळ ठरली.

२९ – २०१७ या वर्षात रोहित शर्माने २९ षटकार ठोकत, हार्दिक पांड्याचा २८ षटकारांचा विक्रमही मोडला.

५० – नागपूरचा पराभव, हा ऑस्ट्रेलियाचा भारतातला ५० वा पराभव ठरला.

Story img Loader