ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतीय संघासाठी बऱ्याच अर्थानी फायदेशीर असेल. ऑस्ट्रेलियामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार असल्याने आगामी विश्वचषकासाठी आम्हाला हा दौरा उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर या संघात बरेच युवा खेळाडू आहेत. या खेळाडूंना हा दौरा म्हणजे चांगली संधी असेल. या दौऱ्यात त्यांना चांगला अनुभव मिळेल, असे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवृत्तीचा विचार नाही

मी फक्त वर्तमानाचा विचार करतो. त्यामुळे सध्याच्या घडीला मी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा विचार करत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर मी निवृत्ती घेईन की नाही, हे मी आत्ता सांगू शकत नाही.

अश्विन मुख्य फिरकीपटू

आमच्यासाठी आर. अश्विन हा मुख्य फिरकीपटू असेल, पण त्याच्या गोलंदाजीची तुलना करू नये. भारतामध्ये तो जास्त बळी मिळवतो आणि परदेशामध्ये का अपयशी ठरतो, असे प्रश्न विचारले जातात. पण खेळपट्टी आणि वातावरणाचा विचार करायला हवा. त्याने गोलंदाजीमध्ये चांगले बदल केले आहेत. तो गोलंदाजीबाबत नेहमीच विचार करत असतो. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी त्याला कोणतेही षटक देतो.

जडेजा आणि अक्षरमध्ये चांगली स्पर्धा

रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये सध्या चांगली स्पर्धा पाहायला मिळत असून ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. संघात स्थान निश्चित करण्यासाठी हे दोघेही अथक मेहनत घेत आहे.

नवीन बदल रंगत आणतील

यापूर्वी अखेरच्या दहा षटकांमध्ये ८०-८५ धावा करणे फारसे अवघड वाटत नव्हते, पण या नवीन नियमांमुळे क्रिकेट अधिक रंगतदार होत आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांना समान संधी मिळत आहे. त्यामुळे या नियमाचा खेळाचा नक्कीच फायदा होईल.

युवा फलंदाजांना पाचवे स्थान देऊ

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपे नसते. त्यामुळे युवा फलंदाजांना आम्ही पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवू. फलंदाजीमध्ये पहिले चार फलंदाज जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे त्यांना पाचव्या क्रमांकावर पाठवणे संघासाठी सोयीस्कर असेल.

शमी दुखापतीतून सावरला आहे

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चांगली गोलंदाजी करत होता, पण त्याला दुखापत झाली. पण तो आता दुखापतीमधून सावरला असून पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याला कधी आणि कुठे गोलंदाजी द्यायची, याचा आम्ही नक्कीच विचार करू.

ऑस्ट्रेलियाचा दौरा आव्हानात्मक – अजिंक्य

या वेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क हे चांगले वेगवान गोलंदाज नसले तरी त्यांच्याकडे अन्य गोलंदाजांची चांगली फळी आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमीच आव्हानात्मक असतो. यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभव आहेच, पण या दौऱ्यातून आम्हाला बरेच काही शिकता येईल, असे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले.

माझ्यासाठी चेंडूचा टप्पा महत्त्वाचा – शमी

ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्यापूर्वी तिथल्या मोठय़ा आकारांच्या मैदानांची चर्चा रंगते आहे. पण माझ्यासाठी मैदानाच्या आकारापेक्षा चेंडूचा टप्पा महत्त्वाचा आहे. दुखापतीतून सावरल्यावर आता दमदार पुनरागमन करण्यासाठी मी सज्ज आहे, असे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सांगितले.

प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न – मनीष पांडे

ट्वेन्टी-२० क्रिकेटचा खेळाडू, असा शिक्का माझ्यावर बसला आहे. पण मी स्थानिक स्तरावर सर्व प्रकारचे क्रिकेट खेळतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मला संधी मिळाल्यास मी अन्य क्रिकेटच्या प्रकारांमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असून मला माझ्यावर बसलेला शिक्का पुसायचा आहे, असे भारताचा फलंदाज मनीष पांडेने सांगितले.

माझ्यासाठी वेग महत्त्वाचा -उमेश यादव

वेगवान गोलंदाज ही माझी ओळख आहे. त्यामुळे माझ्यासाठी वेग फार महत्त्वाचा आहे. गोलंदाजी करताना टप्पा आणि दिशा या दोन गोष्टीही महत्त्वाच्या असतात. त्यांच्याकडेही मी लक्ष देण्याचा प्रयत्न करत असून वेगाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असे भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia tour a great platform for youngsters says ms dhoniaustralia tour a great platform for youngsters says ms dhoni