स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर चितगाव कसोटीला सुरुवात झालेली आहे. मात्र सोमवारी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलमध्ये परतत असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. हा दगड लागून बसची काच फुटली असली तरी कोणत्याही खेळाडुला दुखापत झालेली नाही.
हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऑस्ट्रेलियन संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या सुरक्षेची व्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांसोबत चर्चा करुन दौरा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “हा प्रकार घडल्यानंतर बांगलादेश पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत, संघाला सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. त्यामुळे आम्ही या सुरक्षाव्यवस्थेवर समाधानी आहोत”, असा खुलासा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आलाय.
अवश्य वाचा – Video : ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर बांगलादेशी वाघांचं सेलिब्रेशन
२००६ साली रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली केलेल्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच बांगलादेश दौऱ्यावर आलेला आहे. २०१५ साली ऑस्ट्रेलियाचा नियोजित बांगलादेश दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे चितगाव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.