ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्यानंतर कांगारुंना हरवण्यासाठी भारताने खास व्यूहरचना आखली आहे. इंदूरच्या होळकर मैदानावर रविवारी हा सामना खेळवला जाणार आहे. होळकर मैदानाचे पीच क्यूरेटर समंदरसिंह चौहान यांनी, मैदानाची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी पोषक ठरण्याचे संकेत दिले आहेत.
अवश्य वाचा – VIDEO : हार्दिक पांड्या मैदानात कोसळताच चाहत्यांच्या काळजात धस्स झालं!
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी होळकर मैदानाच्या खेळपट्टीविषयी माहिती दिली. ” या सामन्यासाठी आम्ही मध्य प्रदेशच्या विविध भागांमधून ‘Black Cotton Soil’ नावाची खास माती आणलेली आहे. या मातीत पाणी शोषून धरण्याची क्षमता आहे. त्यामुळे खेळपट्टी ही शुष्क पडण्याची शक्यता कमी आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलसारखे मनगटी फिरकी गोलंदाज या मैदानावर चांगली कामगिरी बजावू शकतात.”
इतर फिरकीपटूंपेक्षा मनगटी फिरकी गोलंदाज हे चांगल्या गोलंदाजीसाठी खेळपट्टीवर अवलंबून राहत नाहीत. खेळपट्टीत उसळी असल्यास त्याचा फायदा घेऊन ते फलंदाजांना अडचणीत आणतात. याचवेळी फलंदाजांनाही या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. परिक्षणासाठी या मैदानावर रणजी खेळाडूंचा एक सामना खेळवण्यात आला. ज्यात धावांचा पाऊस पडला, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात अशाच प्रकारे जास्त धावसंख्या होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही, चौहान यांनी म्हणलं आहे.
दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इंदूर शहरात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र आपला कर्मचारी वर्ग सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी सज्ज असल्याचं चौहान यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पावसाने हजेरी लावली तरीही त्याचा खेळपट्टीवर फारसा परिणाम होणार नाही असं चौहान म्हणाले.
अवश्य वाचा – कुलदीपच्या हॅटट्रिकमध्ये धोनीचा ‘हात’
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हे भारतीय आक्रमणासमोर नांगी टाकताना दिसले आहेत. कुलदीप सिंह आणि युझवेंद्र चहलच्या फिरकीपुढे कांगारुंचा संघ ढेपाळलेला आहे. त्यामुळे इंदूरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.