IND vs AUS 2nd Test Day 4 – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था ५ बाद ११२ अशी झाली आहे. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला ५ बळींची तर भारताला १७५ धावांची गरज आहे. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या भारताला हनुमा विहारी आणि ऋषभ पंत ही जोडी वाचवणार का? याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. विहारी २४ तर पंत ९ धावांवर खेळत आहे. हेजलवूड व लॉयनने २-२ तर स्टार्कने १ बळी टिपला आहे.

भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरूवात खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला, तर भरवशाचा फलंदाज पुजारा ४ धावा करून बाद झाला. कोहली, विजय आणि रहाणे यांनी काही काळ संघर्ष केला, पण तिघेही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर बाद झाले. त्यामुळे आता भारताची मदार पंत आणि विहारी या जोडीवर आहे.

त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर आटोपला. शमीने घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाला रोखणे शक्य झाले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली होती. फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली. अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला. पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श (४५) दुसऱ्या डावात झेलबाद झाला. शमीने त्याला ५ धावांवर बाद केले. हँड्सकॉम्बही १३ धावांवर पायचीत झाला. तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला. हेडने केवळ १९ धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे १७५ धावांची आघाडी होती. आज उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १९० धावसंख्येपर्यंत मजल मारून २३३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र यजमानांनी झटपट गडी गमावले.

तत्पूर्वी, नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर विहारी (२०), कोहली (१२३) आणि शमी (०) झटपट बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ३६ धावांवर माघारी परतला. अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २८३ धावांमध्ये संपुष्टात आला.

Live Blog

14:57 (IST)17 Dec 2018
रहाणे ३० धावांवर बाद, भारताचा निम्मा संघ गारद

खेळपट्टीवर स्थिरावलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणे ३० धावांवर बाद झाला. हेजलवूडने त्याला माघारी धाडत भारताला पाचवा धक्का दिला.

13:59 (IST)17 Dec 2018
लॉयनने उडवला विजयचा त्रिफळा; भारताला चौथा धक्का

फिरकीपटू नॅथन लॉयनने विजयचा त्रिफळा उडवला आणि भारताला चौथा धक्का दिला. विजयने ६७ चेंडूंमध्ये २० धावा केल्या.

13:46 (IST)17 Dec 2018
लॉयनने केली कोहलीची शिकार; भारताच्या तिसरा गडी तंबूत

फिरकीपटू लॉयनने कर्णधार कोहलीला १७ धावांवर बाद केले आणि भारताचा तिसरा गडी तंबूत धाडला. कोहलीने ४० चेंडू खेळून काढले पण स्लिपमध्ये तो झेलबाद झाला.

12:36 (IST)17 Dec 2018
भारताची खराब सुरुवात; चहापानापर्यंत २ बाद १५

२८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल शून्यावर तर पुजारा ४ धावांवर बाद झाला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्था २ बाद १५ अशी झाली होती.

12:25 (IST)17 Dec 2018
राहुल, पुजारा बाद; भारताचे दोन गडी माघारी

भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुल शून्यावर बाद झाला. या धक्क्यातून भारत सावरत असतानाच भरवशाचा फलंदाज पुजारा ४ धावांवर बाद झाला. स्टार्क आणि हेजलवूडने १-१ बळी टिपला.

11:57 (IST)17 Dec 2018
शमीचा बळींचा षटकार; भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य

बुमराहने ऑस्ट्रेलियाचा डाव २४३ धावांवर संपुष्टात आणला. शमीने ६ गडी बाद केले तर ख्वाजाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.

11:22 (IST)17 Dec 2018
नॅथन लॉयन झेलबाद; ऑस्ट्रेलियाचा नववा गडी माघारी

फिरकीपटू नॅथन लॉयन ५ धावा करून तंबूत परतला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

11:05 (IST)17 Dec 2018
बुमराहने उडवला कमिन्सचा त्रिफळा; ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

बुमराहने टाकलेला चेंडू टप्पा पडून अपेक्षित उडाला नाही. त्यामुळे कमिन्स १ धावेवर त्रिफळाचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला.

10:56 (IST)17 Dec 2018
ख्वाजा ठरला शमीचा पाचवा बळी; ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा ७२ धावा करून बाद झाला. त्याच्या रूपाने शमीला पाचवा बळी मिळाला आणि ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला.

10:37 (IST)17 Dec 2018
उसळत्या चेंडूवर पेन पाठोपाठ फिंच झेलबाद; ऑस्ट्रेलियाचे सहा गडी तंबूत

उपहाराच्या विश्रांतीनंतर लगेचच दोन उसळत्या चेंडूवर पेन आणि पाठोपाठ फिंच झेलबाद झाले. मोहम्मद शमीने दोन आखूड टप्प्याचे चेंडू फेकत हे बळी टिपले. त्यामुळे ४ बाद १९० या धावसंख्येवरुन अचानक ऑस्ट्रेलिया ६ बाद १९२ वर पोहोचली.

10:00 (IST)17 Dec 2018
ऑस्ट्रेलियाची चिवट फलंदाजी; उपहारापर्यंत २३३ धावांची आघाडी

उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १९० धावसंख्येपर्यंत मजल मारून २३३ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सत्रात उस्मान ख्वाजाने अर्धशतक केले असून सध्या ख्वाजा - पेन जोडी मैदानावर आहे. यापुढे ऑस्ट्रेलिया धावसंख्येत आणखी किती भर घालते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

09:10 (IST)17 Dec 2018
उस्मान ख्वाजाचे १५४ चेंडूत अर्धशतक

अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा याने अतिशय चिवट खेळी करत १५४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ५ चौकार लगावले.

--

08:40 (IST)17 Dec 2018
यजमान ऑस्ट्रेलियाची मोठ्या आघाडीकडे वाटचाल

ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि कर्णधार टीम पेन यांनी सुरुवातीची षटके सावधपणे खेळून काढली असून त्यात आपली विकेट जाऊ दिलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आता मोठ्या आघाडीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

Story img Loader