मेलबर्न : यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारी आमच्यासाठी धोकादायक ठरणार असे वाटू लागले होते. त्यामुळे अचानक जैस्वाल धावबाद होणे आमच्या पथ्यावर पडले. त्यानंतर लक्षपूर्वक खेळ करणाऱ्या कोहलीचीही एकाग्रता ढासळली, असे मत ऑस्ट्रेलियाचा तारांकित फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले.
‘‘जैस्वालच्या खेळीत खणखणीतपणा होता, तर कोहली कमालीचा शिस्तबद्ध खेळ करत होता. यष्टीबाहेर जाणारे चेंडू सोडून देण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना त्याच्या शरीराच्या जवळ चेंडू टाकणे भाग पडत होते. मात्र, जैस्वाल धावबाद झाल्यावर कोहलीची एकाग्रता भंग पावली आणि आम्हाला पुन्हा वर्चस्व मिळवणे सोपे झाले,’’ असे स्मिथ चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
हेही वाचा >>> IND vs AUS : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! मोडला २२ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा खास विक्रम
जैस्वाल धावबाद झाला, यात दोष नक्की कोणाचा वाटला, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे स्मिथने टाळले. ‘‘जैस्वाल चेंडू मारून धावला आणि कोहलीने त्याला परत पाठवले, यापेक्षा मी जास्त काही पाहिले नाही,’’ असे स्मिथ म्हणाला.
‘‘जैस्वाल आणि कोहली हे दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले होते. ते मोठी खेळी करणार असेच भासत होते. मात्र, जैस्वालचे धावबाद होणे आणि त्यानंतर आणखी दोन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळणे ही सामन्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती,’’ असेही स्मिथने सांगितले.
मोठ्या खेळीचा विश्वास
लयीत नसणे आणि धावा न होणे यात बराच फरक आहे. गेल्या दोन कसोटींपूर्वी माझ्या धावा होत नव्हत्या. मात्र, मी चांगली फलंदाजी करत होतो. मोठी खेळी करण्यात मला यश मिळेल असा मला विश्वास होता. मी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्यामुळे चढ-उतार खेळाचा भागच आहे हे मी जाणतो. मात्र, माझा आत्मविश्वास कधीही कमी झाला नाही, असे स्मिथने नमूद केले.