रावळपिंडी : फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात करणारे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे संघ मंगळवारी एकमेकांसमोर असणार आहेत. त्यामुळे या तुल्यबळ संघांमध्ये सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळेल. दोन्ही संघ या सामन्यात विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपले स्थान भक्कम करण्याच्या दृष्टीने खेळतील.

या दोन्ही संघांची फलंदाजी ही भक्कम आहे. त्यामुळे सामन्यात धावांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू जायबंदी असल्याने या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. मात्र, लाहोर येथे इंग्लंडविरुद्ध विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका त्यांना हलक्याने घेणार नाही.

इंग्लिस, हेडवर भिस्त

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवेल. मात्र, सुरुवातीच्या सामन्यात तरी फलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत त्यांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. इंग्लिसने शतक झळकावत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, कर्णधार स्टीव्ह स्मिथ व सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांना पहिल्या सामन्यात धावा करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी करण्याचा त्यांचा मानस असेल.

● वेळ : दुपारी २.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.

Story img Loader